Nanded Rain: नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना आणि नाल्यांना पूर आला आहे. या पावसाचा सर्वाधिक परिणाम पैनगंगा नदीवर झाला असून, नदीला आलेल्या पुरामुळे इस्लापूर (ता. किनवट) येथील प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधब्याला रौद्र रूप प्राप्त झाले आहे. नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला हा धबधबा सध्या प्रचंड वेगाने कोसळत असल्याने परिसरात थरारक दृश्य पाहायला मिळत आहे.

Continues below advertisement




सहस्त्रकुंड धबधबा वर्षभर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असतो. परंतु पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. सध्या पैनगंगा नदीला मोठा पूर आल्याने या धबधब्याचे विक्राळ दृश्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक इस्लापूर येथे गर्दी करत आहेत. सकाळपासूनच पर्यटकांचा ओघ सुरू असून धबधब्याच्या प्रचंड जलप्रवाहामुळे परिसरात प्रचंड गडगडाट होत आहे.




नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात सलग पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या, नाले तुडुंब भरले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिक सतर्क झाले आहेत. पावसामुळे शेतीला पाणी मिळून फायदा होत असला तरी नद्यांना आलेला पूर ही चिंता वाढवणारी बाब आहे. पैनगंगा नदीचा पाणीस्तर जलद गतीने वाढत असून प्रशासनाने नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.


सहस्रकुंड धबधब्याचं आक्राळ विक्राळ रूप 


सहस्त्रकुंड धबधबा सध्या पर्यटकांना आकर्षित करीत असला तरी धोक्याचा इशारा देणारा आहे. प्रशासनाने पर्यटकांना धबधब्याच्या अगदी जवळ न जाण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही वर्षांत अशा पुराच्या काळात अपघाताच्या घटना घडल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे. या विक्राळ दृश्यामुळे सहस्त्रकुंड धबधब्याच्या आसपासच्या गावांमध्येही चर्चा सुरू आहे.


अनेकांनी मोबाईलवरून या दृश्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. धबधब्याचा गर्जना, पाण्याचे फेसाळलेले लोंढे आणि वेगवान प्रवाह पाहून पर्यटक मंत्रमुग्ध होत आहेत. सध्या तीनही जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम असल्याने नदीचा पाणीस्तर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.