नांदेड : नांदेड पोलिसांनी अवघ्या पोलिस दलाची अब्रू वेशीला टांगण्याचं कृत्य केले आहे. एका प्रकरणात अटक न करण्यासाठी नांदेड पोलीस दलातील एका पोलिसाने 5 हजार रुपयांची लाच मागितली. आपल्याकडे पैसे नाहीत त्यामुळे आईचे मंगळसूत्र विक्री करून पैसे द्यावे लागतील असे आरोपीने सांगूनही या भ्रष्ट पोलिसाने मंगळसूत्र विक्री करायला लावून लाचेची 5 हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. आता हा पोलीस आणि त्याचा साथीदार एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे.


प्रकरण काय आहे?

रामदेव (नाव बदललेले आहे) याची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आई, पत्नी आणि दोन लहान मुलांची जबाबदारी रामदेववर आहे. त्यामुळे मिळेल ती मोलमजुरी करून रामदेव आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतो. गेल्या काही दिवसांपासून रामदेव आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरु होता. रागाच्या भरात रामदेवच्या पत्नीने त्याच्याविरोधात उमरी पोलीस स्थानकात एक तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यावर पोलीस हवालदार उद्धव घुले यांनी रामदेवला अटक करण्याची धमकी दिली आणि अटक टाळायची असेल तर 5 हजार रुपये लाच देण्याचे फर्मान सोडले.

मोलमजुरी करणारा रामदेव एवढे पैसे देऊ शकत नव्हता. त्याने हवालदार घुलेची खूप विनवणी केली. त्याचाही आई आणि लहान मुलगा घुलेंच्या पाय पडूनही विनवणी करीत होते. पण हवालदार लाचेवर ठाम होता. आपल्या आईचे मंगळसूत्र विक्री करूनच रक्कम उभी करावी लागेल, असे रामदेवने हवालदार घुले याना सांगितले. तरीही घुले यांना दया आली नाही. उलट हवालदार घुले याने मंगळसूत्र विक्रीतून आलेले पैसे इतरत्र खर्च न करता लाच देण्याचे फर्मान सोडले.

अखेर रामदेवने आईचे मंगळसूत्र घेऊन सराफ्याचे दुकान गाठले. मंगळसूत्र विक्री करून 5 हजार 700 रुपये मिळाले. इतक्यात एसीबीला संपर्क करण्याचा सल्ला रामदेवळा मिळाला. त्याने थेट एसीबीला संपर्क साधला आणि संपूर्ण प्रकार कळवला. एसीबीने सापला लावला आणि मध्यस्थ अशोक चव्हाण यांच्या मार्फत 5 हजाराची लाच स्वीकारताना मध्यस्थ आणि हवालदार उद्धव घुले एसीबीच्या जाळ्यात अडकला.