बीड : गेवराईचे भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांच्याविरुद्ध काल गेवराई पोलिसात अट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर काल गेवराईत तणावाचं वातावरण होतं. आमदार लक्ष्मण पवार हे गेवराई पोलिसात आपणास अटक करावी अशी मागणी करत समर्थकांसह हजर झाले, तर पोलिसांनी त्यांना अटक न करता या बाबतची सविस्तर चौकशी करूनच पुढील कारवाई करू असं सांगितलं.


गुरुवारी दुपारी शहरातील आतिक्रमण काढण्यावरून गेवराईमध्ये वाद निर्माण झाला. या वेळी आतिक्रमण करणाऱ्या सुतार कुटुंबियासोबत काहींची धक्काबुकी झाली. या प्रकरणानंतर गेवराई पोलीस ठाण्यात आमदार लक्ष्मण पवार यांच्या विरोधात अट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.

गेवराई शहरात या घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला. गेवराई शहरातील लहुजी साळवे चौकातील अतिक्रमण काढण्यावरून गुरुवारी झालेल्या बाचाबाचीनंतर भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या विरुद्ध गेवराई पोलिसात अट्रॉसिटी आणि विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा राजकीय द्वेषातून दाखल करण्यात आला असल्याचं आमदार लक्ष्मण पवार यांनी सांगून इतक्या खालच्या पातळीवर जाऊन विरोधक हे राजकारण करत असल्याचं पंडित यांचं नाव न घेता त्यांनी सांगितलं.

या प्रकरणातील फिर्यादी अमन सुतार हे राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य अमरसिंह पंडित गटाचे आहेत. म्हणूनच आमदार पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पंडितानी जोर लावल्याची चर्चा गेवराई शहरात आहे. म्हणुनच काल सकाळी मला अटक करा म्हणून स्वतः आमदार पोलीस स्टेशनला गेले होते. मात्र प्रथमदर्शनी यात काही तथ्य वाटत नसल्याकारणांनी पोलिसांनी त्यांना अटक केली नाही.

दरम्यान या घटनेचा शहरातील वेगवेगळ्या संघटनांनी निषेध व्यक्त करत आमदार लक्ष्मण पवार यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला असल्याचं म्हटलंय. हा गुन्हा राजकीय द्वेषातून नोंदविला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.