नांदेडच्या लोह्यात रस्ताच नाही, गावकरी चिखलात उपोषणाला
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2016 02:03 PM (IST)
नांदेड : भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष लोटली, मात्र नांदेडमधील लोहा तालुक्यातल्या आजमवाडीत रस्ताच पोहोचलेला नाही. त्यामुळे आजमवाडीकर ओढ्यातील चिखल पाण्यातच आमरण उपोषणाला बसले आहेत. लोहा तालुक्यापासून सात किलोमीटरवर असलेल्या आजमवाडीत चौथीपर्यंतच शाळा आहे. त्यामुळे गुडघाभर चिखल-पाण्यातून पायपीट करत मुलांना शाळेत जावं लागतं. रुग्णांना खाटेवरुन नेण्याशिवाय पर्याय नाही, तर शेतकऱ्यांना बाहेरुन कोणतीही वस्तू आणता येत नसल्यानं प्रचंड हाल होत आहेत. या त्रासाला कंटाळलेल्या आजमवाडीकरांनी मंत्रालयापर्यंत खेटे मारले पण कुणीच दाद देत नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना कळवूनही या गावाला रस्ता मिळाला नाही. त्यामुळे अखेरीस गावकऱ्यांनी या दलदलीतच आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.