नांदेड : नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर अनेकांची दुकानं बंद झाली. त्यामुळेच काही लोक समाजात जातीय तणाव निर्माण करत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. ते आज नांदेडमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

...तो महाराष्ट्रातील काळा दिवस!
यावेळी नितीन गडकरींनी जलयुक्त शिवारच्या यशाबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. तसंच मराठवाड्याला केंद्रीय जलसंधारण विभागाकडून एक लाख कोटीचा निधी देण्याची घोषणाही केली. शिवाय लातूरला रेल्वेने पाणी दिलं तो महाराष्ट्रातील काळा दिवस होता, असंही ते म्हणाले.

वीज, पाणी आणि रस्ते हे विकासात अत्यंत महत्त्वाचे असतात. जो ज्या जातीचा असतो तो कधीच त्या जातीचा विकास करत नाही, तसंच जो ज्या भागाचा नेता असतो तो तिथला विकास करत नाही हे सत्य आहे, असंही नितीन गडकरी म्हणाले.

आता जायकवाडी 90 टक्के भरलेलं असेल!
मुख्यमंत्री असताना अशोक चव्हाणांनी पिंजर-बाणगंगाबाबत गुजरातशी केलेला करार मराठवाड्यावर अन्यायकार होता. मात्र भाजपची सत्ता आल्यानंतर त्यात सुधारणा करुन चार धरणांची भर घातली. त्यामुळे जायकवाडी आता कायम 90 टक्के भरलेलं असेल, अशी ग्वाही गडकरींनी यावेळी दिली.