Nanded News : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मागासवर्गीयांवर हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहे. आता, नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील लहान गावात महाविद्यालयीन वादातून मागासवर्गीयांच्या वस्तीवर जमावाने हल्ला केला. जवळपास दोनशे ते तीनशे लोकांच्या जमावाने हा हल्ला केला असल्याचे म्हटले जात आहे. 


महाविद्यालयातील अंतर्गत वादाचे पडसाद या वस्तीवरील हल्ल्यामध्ये झाल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय काबाडे यांनी दिली. सोमवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. हल्लेखोर जमावाने अनेक घरांवर तुफान दगडफेक करत तोडफोड केली. त्याशिवाय, वस्तीतील महिला, वृद्ध, लहान मुले यांनाही मारहाण करण्यात आली. गावातील महाविद्यालयीन तरुणांच्या भांडणाचे रूपांतर नंतर मागासवर्गीय वस्तीवर दगडफेक करण्यात झाली. या हल्ल्यानंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी या हल्ल्या प्रकरणी हल्लेखोरांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.


दरम्यान, मराठवाड्यात मागील काही दिवसांमध्ये सामाजिक भेदभाव, अत्याचाराच्या घटना समोर आल्या होत्या. हिंगोली जिल्ह्यातील सावरखेडा गावामध्ये गायरान जमिनीवर निळा झेंडा लावल्याच्या कारणावरून अनुसूचित जातींच्या समाजावर संपूर्ण गावाने बहिष्कार टाकला. गावातील महिला सरपंचाचे दीर भागवत मुंडे यांनी एक जानेवारी रोजी बैठक घेऊन संपूर्ण सवर्ण समाजाच्या वतीने दलितांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून आजपर्यंत दलित समाजातील नागरिकांना पिठाच्या गिरणीवर दळून दिले जात नाही. शिवाय किराणा दुकानदार बाजार देत नसल्याची तक्रार समोर आली होती.  


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha