नांदेड : माहूर इथे देवदर्शनासाठी आलेल्या मायलेकीला चारचाकी वाहनाने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. यात लेकीचा जागीच मृत्यू झाला तर आई गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.


नांदेडमधील श्रीक्षेत्र माहूर इथल्या श्री देवदेवेश्वर मंदिरजवळील एका दुकानात झोपलेल्या मायलेकीला इंडिका कारने चिरडलं. ज्यात लेकीचा जागीच मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली. अपघातील मायलेकी हदगाव तालुक्यातील मौजे करोडी इथल्या रहिवासी आहेत. 


लक्ष्मीबाई शिवराम खंदारे (वय, 70 वर्षे) आणि त्यांची  मुलगी (शिला आनंदराव इनकर वय 48 वर्षे) या दोघी मागील सहा दिवसांपूर्वी देवदर्शनासाठी देवदेवेश्वरीजवळ माहूरात आल्या होत्या. दरम्यान माहूरातील श्री देवदेवेश्वर मंदिराजवळील एका दुकानात रात्री झोपल्या. आज पहाटेच्या सुमारास 'एम.एच.44 जी 0375' क्रमांकाच्या "टाटा इंडिका विस्टा" या कारच्या चालकाने निष्काळजीपणे गाडी पाठीमागे घेतली. गाडी शिला आनंदराव इनकर यांच्या अंगावरुन गेली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर लक्ष्मीबाई शिवराम खंदारे यांच्या मनगट, गुडघा आणि खांद्यावरुन गाडीचे चाक गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. 


माहूर पोलीस स्टेशनच्या गस्ती पथकाने मायलेकींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बोडखे यांनी तपासणी केली असता शिला इनकर यांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी घोषित केलं. तर त्यांच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


या प्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित कार आणि चालकाला ताब्यात घेतलं आहे. माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव रिठ्ठे यांच्या मार्गदर्शनाथाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार पुढील तपास करत आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या