Nanded News Updates : नांदेड शहरात विविध गुन्ह्यांच्या घटनांनी सध्या धुमाकूळ घातला आहे. शहरातील आरोपीचं दहशतवाद्यांशी कनेक्शन, हत्या, चोरी अशा गुन्ह्यांनी नांदेड सध्या चर्चेत आलं आहे. अशात आता एक नवीन प्रकार समोर आल्यानं पोलिस देखील चक्रावून गेले आहेत. नांदेडमध्ये चक्क 'पाकिस्ताननगर' नावाचा भाग अवतरल्याचं हे प्रकरण आहे. 


त्याचं झालं असं की, नांदेड शहरातील देगलूर नाका भागात असलेल्या  शेख खलील या 25 वर्षीय तरुणाने आपल्या भावाच्या मुलासाठी ऑनलाईन अॅपवरून कपडे मागविले होते. त्याला लिहिता-वाचता येत नसल्याने त्यानं व्हाइस रेकॉर्ड करून पत्ता पाठवला. परंतु गैरसमजातून समोरील कंपनीने पार्सलवर शेख खलील यांच्या नावाच्या खाली 'पाकिजानगर' ऐवजी 'पाकिस्ताननगर' नांदेड असा पत्ता टाकला. त्यामुळे खलिलला थेट पोलीस ठाणे गाठावे लागले. 


कारण पाकिजानगर ऐवजी पाकिस्ताननगर असा पत्ता, छापून असलेले पार्सल नांदेडात दाखल झाले आणि ते कुरिअर खलील याला मिळल्यानंतर त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इतवारा पोलिसांपर्यंत पोहोचला. सदर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आणि लगेच त्यांनी चौकशी सुरु केली. यामुळं शेख खलील याला चौकशीसाठी पोलि स्थानकात बोलवण्यात आले. 


त्याची तपासणी करण्यात आली असता कोलकाता येथील संबधित कंपनीशी नांदेड पोलिसांनी संपर्क साधला. त्यानंतर हा सर्व प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचे पुढे आले आहे. परंतु सोशल मीडियावर मात्र हा व्हिडिओ व्हायरल करून सामाजिक सामाजिक सलोखा बिघडवण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सदर व्हिडीओ सोशल माध्यमावर व्हायरल केल्यास आणि त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य खराब केल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. 


एका तरुणाच्या छोट्याशा चुकीमुळं पोलिस प्रशासन कामाला लागलं. आजकाल अनेक जण ऑनलाईन अॅपवरूनच वस्तूंची खरेदी करत आहेत. त्यामुळं त्यासाठी पत्ता आणि इतर माहिती देताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या




Nanded Case : हरियाणातून अटक केलेल्या दहशतवाद्यांचा महाराष्ट्र एटीएस ताबा घेणार, म्होरक्या अद्याप फरार