मुंबई : पत्नीचा मानसिक, शारिरीक छळ, मारहाण आणि परस्त्रीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेल्या गजानन काळे यांच्या अटकपूर्व जामीनावर मंगळवारी सुनावणी पूर्ण झाली. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी आपला निकाल राखून ठेवला असून तो उद्या म्हणजेच बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या या गुन्ह्यामुळे भोवर्‍यात अडकलेल्या मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांना तूर्तास अटक न करण्याचे निर्देश हायकोर्टानं कायम ठेवले आहेत. आपल्याविरोधातील सर्व आरोप चुकीचे असून हा निव्वळ पतीपत्नी यांच्यातील बेबनाव असल्याचा प्रकार आहे असं काळे यांच्यावतीनं हायकोर्टात सांगण्यात आलं.


काळे यांच्या पत्नीनं काही दिवसांपूर्वी नेरूळ पोलीस ठाण्यात याबाबत रितसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी मानसिक आणि शारिरीक छळ करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमांखाली गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अटकेची शक्यता निर्माण झाल्यानं काळे यांनी प्रथम ठाणे सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायाधीश जी. पी शिरसाठ यांनी फेटाळला लावला आहे. त्या निकालाविरोधात काळे यांनी हायकोर्टात धाव घेत त्याला आव्हान देत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकीलांनी या संदर्भात माहिती घेण्यासाठी न्यालयाकडे वेळ मागितला याची दखल घेत न्यायालयानं याचिकेची सुनावणी 7 सप्टेंबरपर्यंत तहकूब ठेवली होती. आणि तोपर्यंत काळे यांच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नका असे निर्देश नवी मुंबई पोलीसांना दिले होते. गजानन काळे यांच्या या याचिकेला विरोध करत त्यांच्या पत्नी आणि मूळ तक्रारदार यांनीही हायकोर्टात मध्यस्थ याचिका दाखल केली आहे.


मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजाजन काळे यांना हायकोर्टाचा दिलासा, 7 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश


संजिवनी काळे यांचे गंभीर आरोप
गजानन काळे यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा फायदा उचलून मोठ्या प्रमाणात काळी माया गोळा केली आहे. शिक्षण प्रवेश आणि मनपा अधिकाऱ्यांना धाक दाखवून करोडो रुपये गजानन काळे यांनी गोळा केले. याबाबत तपास होणार असेल तर आपण यंत्रणेला सगळी माहिती देण्यास तयार आहोत असे पत्नी संजिवनी काळे यांनी सांगितलं होतं. घरात जास्त दिवस रोकड न ठेवता अन्य व्यक्तीच्या नावावर सर्व रोकड बँकेत जमा करायचा. ही रोकड घेऊन येणाऱ्या चार कार्यकर्त्यांची नावेही त्यांनी सांगितली आहेत. लाखो रुपये गोळा करून हे कार्यकर्ते घरी यायचे. एबी नावाच्या बोगस कंपनीच्या नावाने सर्व आर्थिक व्यवहार करण्यात आले आहेत. सदनिका, चार चाकी वाहने, मोबाईल अशा सर्व गोष्टींचे व्यवहार याच कंपनीच्या नावावर करण्यात आल्याचा गौप्यस्फोट संजीवनी यांनी केल्याने गजानन काळे यांच्या अडचणीत भर पडली आहे.