नांदेड : आयपीएस अधिकाऱ्याच्या वतीने एक लाखांची लाच स्वीकारताना एक जण एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. रेतीची कारवाई थांबवण्यासाठी आयपीएस अधिकारी विजयकृष्ण यादव यांनी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
अमरावती लाचलुचपत विरोधी पथकाने नांदेडमध्ये ही कारवाई केली. अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलिस स्थानकात कार्यरत असताना रेतीची कारवाई थांबवण्यासाठी यादव यांनी लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नांदेडच्या इतवारा पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आरोपी जी. विजय कृष्णन यादव ( IPS 2015 RR) सध्या उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नांदेडच्या इतवारा उपविभागात कार्यरत आहेत. यादव हे मूळ तेलंगणातील हैदराबादचे रहिवासी आहेत. दुसरा आरोपी सन्निसिंग इंदरसिंग बुगई नांदेडचा रहिवासी आहे.
फिर्यादींविरोधात तिवसा पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी, रेतीचा ट्रक सोडण्यासाठी आणि चार्जशीट दाखल करण्यासाठी मदत केल्याबद्दल कामाचा मोबदला म्हणून दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
आरोपींनी दोन लाखांच्या लाचेची मागणी केली असून एक लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलं. मंगळवारी एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. ही सर्व रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.