औरंगाबाद : "शिवसेनेला काँग्रेससोबत यायचं असेल तर त्यांनी हायकमांडशी संपर्क साधावा," असं वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. त्यामुळे काँग्रेसकडून शिवसेनेला ही ऑफर तर नाही ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


औरंगाबादमध्ये काँग्रेसचं व्हिजन 2019 शिबीर सुरु आहे. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेते पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.

"शिवसेनेने काँग्रेसमध्ये यावं की नाही याबाबत मी बोलणार नाही. हा निर्णय दिल्लीत होतो. शिवसेना सत्तेत आहे. शिवसेना सत्तेबाहेर झाली आणि त्यांना काँग्रेससोबत यायचं असेल तर त्यांना हायकमांडशी संपर्क करावा लागेल," असं चव्हाण म्हणाले.

तसंच भाजप शिवसेनेला साम-दाम-दंड-भेद वापरुन स्वत:सोबत ठेवणार आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

दरम्यान, औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना आणि काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानामुळे नवी सत्ता समीकरणं जुळू लागली आहेत.