नागपूर : नागपुरात वाडी परिसरातील वेलट्रीट रुग्णालयात आज संध्याकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली. वेलट्रीट रुग्णालयात लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर ही आग लागली. आग लागली त्या वेळेला रुग्णालयात अनेक रुग्ण उपचार घेत होते. अनेक जणांना सुरक्षित सुरक्षित बाहेर हलवल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिली होती.


संध्याकाळी साडे आठच्या सुमारास रुग्णालयाच्या वरच्या माळ्यावरील आयसीयूमधून या आगीला सुरुवात झाली आणि पाहता पाहता ही आग आयसीयूसह रुग्णालयात इतरत्र पसरली. आग लागली तेव्हा रूग्णालयात 31 रुग्णांवर उपचार सुरु होते.. तडकाफडकी उपचार सुरू असलेल्या रुग्णांना खाली आणून इतर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र दुर्दैवाने तीन जणांचा या आगीमध्ये मृत्यू झालाय. ही आग कशी लागली याबद्दल अजून स्पष्टता नाही. मात्र आयसीयूमधील विजेच्या उपकरणांचामधून आधी आगीची सुरुवात झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


ज्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले ते सर्व आयसीयूमध्ये दाखल रुग्ण होते, त्यामुळे आधीच त्यांची परिस्थिती गंभीर होती.तडकाफडकी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.