पैसे बदलण्यासाठी बँकेत आलेल्या वृद्धाचा रांगेतच मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 16 Nov 2016 10:52 AM (IST)
नांदेड : नोटा बदलण्यासाठी बँकेबाहेरच्या रांगेत उभ्या असलेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. दिगंबर मारीबा कसबे असं मृत व्यक्तीचं नाव असून ते 70 वर्षांचे होते. मूळचे बळीरामपूरचे असलेले दिगंबर कसबे तुप्पा इथल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पैसे बदलण्यासाठी आले होते. मात्र बँकेबाहेर रांगेत उभे असतानाच त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. रांगेतील लोकांनी त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. हृदयविकाराच्या झटक्याने दिगंबर कसबे यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण शवविच्छेदन अहवालानंतरच नेमकं कारण स्पष्ट होईल.