रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय नाणार प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. अशोक वालम यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी पत्र लिहून हा निर्णय कळवला आहे.


उद्योग मंत्रालय शिवसेनेकडे आहे. त्यामुळे आधी उद्योग विभागाने काढलेला अध्यादेश रद्द करा, अन्यथा नाणारमध्ये येऊ नका, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्या नाणार दौऱ्याला प्रकल्पग्रस्तांनी विरोध दर्शवला. सोमवारी 23 तारखेला उद्धव यांच्या नियोजित सभेवर बहिष्कार टाकण्याचा अल्टिमेटम प्रकल्पग्रस्तांनी दिला.

सुभाष देसाईंच्या उद्योग मंत्रालयाने 18 मे 2017 रोजी काढलेला अध्यादेश 15 दिवसात रद्द करण्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी 28 नोव्हेंबर 2017 ला दिलं होतं, मात्र ते पूर्ण न केल्याबद्दल नाणारवासियांनी नाराजी व्यक्त केली आहे. 17 गावांतील प्रकल्पग्रस्तांनी सभेकडे पाठ फिरवण्याचं ठरवलं आहे.

उद्धव ठाकरे उद्या नाणारवासीयांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.