नागपूर : देशाच्या लोकसभेत आणि राज्यसभेत सुमारे 200 पेक्षा जास्त खासदार असे आहेत, ज्यांची घोषित केलेली संपत्ती 20 कोटींच्या वर आहे, अशा खासदारांना पगारवाढ कशाला हवी, असा प्रश्न विचारत भाजप खासदार वरुण गांधी यांनी स्वतःचा पगार स्वतःच वाढवून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी नागपुरात युवा सन्मान सोहळ्यात युवकांना मार्गदर्शन केले.

संसदेच्या दोन्ही सभागृहात अनेक श्रीमंत खासदार असताना तेच खासदार हात ऊंचावून स्वतःचे पगार वाढवून घेतात हे दुर्दैवी असल्याचे वरुण गांधी म्हणाले. तसेच, अशा पगारवाढीचा मी संसदेत विरोध केला होता आणि भविष्यातही करत राहणार, असे त्यांनी नमूद केले.

गेल्या 9 वर्षात मी स्वतः एकही रुपया पगार घेतला नसल्याचा खुलासा ही त्यांनी यावेळी केला.

लोकसभा अध्यक्षांनी अशा सर्व श्रीमंत खासदारांचे पगार थांबवण्यासाठी प्रयत्न करावे, देशात एक मोहीम सुरु करावी अशी मागणी वरुण गांधी यांनी केली.

महिला आरक्षण अत्यंत गरजेचे आहे, मात्र सध्या ते ज्या स्वरुपात आहे, त्यामुळे महिलांना फारसा फायदा होत नसल्याचे वरुण गांधी म्हणाले. महिला आरक्षणाचा फायदा मोठ्या नेत्यांच्या कुटुंबातील महिलांना किंवा आरक्षणाचा लाभ घेऊन पदावर आलेल्या महिलांच्या नातेवाईकांना होत असल्याची टीका वरुण गांधी यांनी केली.