मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) मुंबईत आल्या आणि त्यांनी काँग्रेसला डिवचलं. त्यामुळे गेल्या काही दिवसात राज्यात शांत असलेली काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आग्रही आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत येऊन काँग्रेसच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं. यूपीए आहेच कुठे? असा सवाल विचारत काँग्रेसची कोंडी केली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत हे सगळ घडल्यानंतर आता काँग्रेस आक्रमक होत आहे. आता विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
दहा महिन्यापूर्वी नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यापासून राज्यातील विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त आहे. मधल्या काळात झालेल्या दोन अधिवेशनात हंगामी अध्यक्षांनी काम पाहिलं. अध्यक्षपदाची निवड तातडीने व्हावी यासाठी काँग्रेस सातत्याने मागणी करत आहे परंतु आतापर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादीने काँग्रेसच्या या मागणीकडे फारसं गांभीर्याने घेतलं नाही. याच मुद्द्यावरून भाजपही काँग्रेसला चिमटा काढते.
- महाविकास आघाडीचे संख्याबळ
शिवसेना - 56
राष्ट्रवादी - 53
काँग्रेस - 43
तिन्ही पक्षांचे मिळून - 152
- महाविकास आघाडीला पाठिंबा असलेले पक्ष
बहुजन विकास आघाडी - 3
समाजवादी पार्टी - 2
प्रहार जनशक्ती पार्टी - 2
माकप - 1
शेकाप - 1
स्वाभिमानी पक्ष - 1
क्रांतिकारी शेतकरी पार्टी - 1
अपक्ष - 8
एकूण - 171
विरोधकांकडे असलेले संख्याबळ
भाजप - 106
जनसुराज्य शक्ती - 1
राष्ट्रीय समाज पक्ष - 1
अपक्ष - 5
एकूण - 113
तटस्थ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 1
एमआयएम - 2
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली तर महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ आहे. पण या निवडणुकीत गुप्त मतदान झालं तर दगाफटका होऊ शकतो. त्यामुळेच ही निवडणूक आवाजी मतदानाने व्हावी यासाठी येत्या अधिवेशनात विधेयक मांडले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ममता बॅनर्जी यांचा काँग्रेसवरील राग, महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून मिळणारी काँग्रेसला दुय्यम वागणूक या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर असतो. त्यामुळेच आता आधी अध्यक्षपदाची निवडणूक घ्या आणि मगच पुढे जा असा आक्रमक सूर काँग्रेसन आळवलाय. आत्तापर्यंत दोन अधिवेशनात तरी काँग्रेसच्या या मागणीला मित्र पक्षांनी फारसं गांभीर्याने घेतलं नाही. आता किमान हिवाळी अधिवेशनात तरी अध्यक्षपदाची निवडणूक होते की पुन्हा एकदा काँग्रेसला गृहीत धरलं जातं हे पाहणे महत्त्वाचे आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :
- भाजपविरोधी लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे; नाना पटोलेंचे ममता बँनर्जींना उत्तर
- Mamata Banerjee : कोणती यूपीए? आता यूपीए उरली नाही; शरद पवारांच्या भेटीनंतर ममतांचा काँग्रेसला 'कात्रजचा घाट'
- Mamata Banergee : काँग्रेसला वगळून आघाडी करणार, जे लढतील त्यांना सोबत घेणार; ममता बॅनर्जींचे संकेत