Rajiv Satav Demise:  खासदार राजीव सातव यांच्या निधनानं संपूर्ण राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली आहे. राजकीय वर्तुळात त्यांच्या जाण्यानं एक पोकळीच निर्माण झाली असून, राज्य एका हरहुन्नरी नेत्याला गमावून बसलं आहे अशा शब्दांत नेतेमंडळींनी त्यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं. अवघ्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील 23 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात कोरोनावरील उपचार सुरु होते. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाल्याची बाब समोर आली. 


उच्चशिक्षित, साधं राहणीमान आणि अभासू वृत्ती अशी राजीव सातव यांची ओळख. अशा या नेत्याच्या निधनाचं वृत्त कळताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दु:ख व्यक्त केलं. 
'राजीव सातव तु हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खुप अपेक्षा होत्या..तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे..
चार दिवसापूर्वीच विडिओ काॅलवर आपण निशब्द हाय हॅलो केले..लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे..
तुला श्रध्दांजली कोणत्या शब्दात वाहू?', असं ट्विट राऊत यांनी केलं. 






राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही ट्विट करत राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली. 'गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे', असं त्यांनी या श्रद्धांजलीपर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं. 






काँग्रेस नेते, नाना पटोले यांनी राजीव सातव यांच्या जाण्यानं आपलं नुकसान होण्यासोबतच काँग्रेस पक्षाचंही मोठं नुकसान झाल्याची खंत व्यक्त केली. यावेळी त्यांनी हसतमुख चेहऱ्याच्या सातव यांची आठवण काढते ते आपल्याला लहान भावाप्रमाणेच होते या शब्दांत त्यांच्याशी असणारं नातं व्य़क्त केलं. 'राजीवबद्दल बोलायला शब्द अपुरे पडतात', असं ते जड अंत:करणाने म्हणाले. 


राजकीय वर्तुळात अशोक चव्हाण आणि राजीव सातव यांची नावं एकत्र आली की अनेक चर्चा होतं. आपल्या पक्षातील सहकाऱ्याच्या निधनामुळं अतीव दु:ख झाल्याची भावना अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.










राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपण राजीव सातव यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आलं असतानाच त्यांच्या निधनाचं वृत्त मिळालं आणि धक्का बसला अशी प्रतिक्रिया दिली. मनाला चटका देणारी ही घटना अतिशय वेदनादायी आहे असं म्हणत सातव कुटुंबीयांप्रती त्यांनी आधार देणारी भावना व्यक्त केली. युवकांचं नेतृत्त्व करणारा नेता आणि राज्याच्या राजकीय वर्तुळाच अपेक्षांचं ओझं असणारा नेता अशी राजीव सातव यांची ओळख यावेळी राजेश टोपे यांनी अधोरेखित केली. राजीव सातव यांच्याप्रमाणंच तरुण फळीतील नेता म्हणून ओळख असणाऱ्या विश्वजीत कदम यांनीही सातव यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं. 


कोविडमुळं निधन झालेले राजीव सातव हे दुसरे महत्त्वाचे नेते असल्याचं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी देशानं तरुण, होतकरु नेता गमावल्याचं दु:ख व्यक्त केलं. युवा नेत्याचा परिवार गोळा करुन काँग्रेसची ताकद उभारण्याचा ते प्रयत्न करत असल्याचं म्हणत राजीव सातव यांच्या कार्याला दाद दिली. राज्यातून निघून दिल्ली दरबारी पोहोचणाऱ्या सातव यांनी कायमच राज्यावरही बारीक नजर ठेवली होती, संघटनेच्या कामात त्यांनी स्वत:ला वाहून घेतलं होतं, अशा शब्दांत चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली.



 


'सकाळी सकाळीच राजीव सातव यांच्या निधनाची आलेली बातमी दुःखद आहे. आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा जबरदस्त प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला. गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी अत्यंत नेत्रदीपक असे काम केले. काँग्रेसचे भविष्यातील एक आश्वासक नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. सातव यांचे निधन हि काँग्रेसची मोठी हानी आहे. सातव परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत', असं म्हणत राजीव सातव यांना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.