मुंबई : एकीकडे सामान्यांसाठी मंत्रालय प्रवेशाकरता निर्बंध आणले जातायेत तर दुसरीकडे दलालांचा मात्र मंत्रालयात मुक्त संचार आहे असा थेट आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. मंत्रालयजवळच्या निर्मल बिल्डींगमध्ये या सरकारचा सर्वात मोठा दलाल बसतो, या दलालाचं रेकॉर्डिंग काँग्रेसकडे असल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या अधिवेशनात भाजपच्या (BJP) पेन ड्राईव्हपेक्षा मोठा बॉंब फोडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. नाना पटोले यांचा इशारा भाजपच्या कोणत्या नेत्याकडे आहे याची राजकीय चर्चा आता सुरू आहे. 


कंत्राटं कुणाला द्यायची हे निर्मल बिल्डिंगमध्ये ठरतं


राज्यातल्या कामांचं कंत्राट कुणाला द्यायचं हे मंत्रालयाजवळच्या निर्मल बिल्डिंगमध्ये ठरत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. ते म्हणाले की, राज्यातल्या मोठ्या कंत्राटांच्या मोठ्या रकमा याच निर्मल इमारतीतून ठरतात. कंत्राट कोणाला द्यायचं हे ही निर्मल इमारतीतल्या याच दलाला कडून ठरवलं जातं. निर्मल बिल्डिंगमधल्या या दलालाचा पर्दाफाश येणाऱ्या अधिवेशनात काँग्रेस करणार आहे. भाजपच्या पेनड्राईव्ह बॉम्बपेक्षाही काँग्रेस मोठा बॉम्ब टाकणार. 


नाना पटोलेंनी केलेले आरोप आणि त्यांचा इशारा कुणाकडे आहे याची राजकीय चर्चा आता चांगलीच रंगल्याचं दिसून येतंय. तसेच नाना पटोले यांच्याकडे नेमके काय रेकॉर्डिंग आहेत आणि नेमके काय पुरावे असण्याची शक्यता आहे याबद्दलही चर्चा सुरू आहे. 


Nana Patole On BJP : महायुतीमध्ये समन्वय नाही


कुणीतरी मगाशी ट्विट केलं नंतर ते डिलीट केलं, यावरुन भाजप आणि इतर दोन पक्षांमध्ये किती सुसंवाद आहे हे दिसतंच आहे असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.


दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी शर्यत


राज्यातल्या महायुतीच्या सरकारवर टीका करताना नाना पटोले यांनी या तीन पक्षांमध्ये समन्वय नसल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, पहिला मुख्यमंत्रीपदापर्यंत कोण पोहोचतंय याची शर्यत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये लागली आहे. 


राज्यात कायद्याचं राज्य राहिलं नाही


राज्यात डॉब्लीमुळे झालेल्या मृत्यूवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात कोणत्याही नियमांचं पालन होत नाही. कायद्याचं राज्य उरलेलं नाही. गणपती बाप्पा या सरकारला बुद्धी देवो. त्यांना बुद्धी नाही आली तर हे सरकार लवकर जाऊ दे. 


ही बातमी वाचा: 



  • सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यानंतर तारखा, तरीही नार्वेकरांकडून वेळकाढूपणा; आमदार अपात्रतेप्रकरणी ठाकरे गट आक्रमक