पुणे : यूट्यूबवरील गाण्यात एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस सोन्याचा भासल्यामुळे चोरी करणाऱ्या चोरट्यांना अखेर अटक झाली आहे. तब्बल दीड वर्षांनंतर दोघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. राहुल गावंडे आणि सोमनाथ गावंडे यांनी लोणावळ्याजवळील कार्लागडावरील एकवीरा मंदिराचा कळस चोरला होता.


यूट्यूबवरील गाण्यात एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस सोन्याचा दिसत असल्याने आरोपींनी कळस चोरी करण्याचा डाव आखला. त्यानुसार तीन ऑक्टोबर 2017 रोजी त्यांनी कळसाची चोरी केली.



मंदिराच्या पठारावर बसून त्यांनी कळस घासला असता तो सोन्याचा नसून धातूचा असल्याचं त्यांना समजलं. त्यामुळे कळस चोरुन न नेता त्यांनी डोंगराच्या एका नाल्यात लपवून ठेवला होता.

अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले चोरटे हे ठाकर समाजाचे आहेत. एक जण सेंटरिंगचे काम करतो, तर दुसरा शेती करतो. त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता आरोपींनी कळस चोरीची कबुली दिली. एकविरा देवीच्या डोंगरात शोध घेत चोरट्यांनी लपवलेला कळस हस्तगत करण्यात आला.