सांगली/कोल्हापूर : अभिनेते नाना पाटेकर, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, जयदीप ठाकरे यांनी कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी नाना पाटेकरांनी शिरोळमध्ये जाऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि पूरग्रस्तांना 500 घरं बांधून देण्याचा निश्चय बोलून दाखवला.


अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागाला भेट दिली. सांगलीतील गणपती पेठेत झालेल्या नुकसानीची उर्मिला मातोंडकर यांनी पाहणी केली. तर शर्मिला ठाकरे यांनी सांगलीतील पलूसजवळच्या ब्रह्मनाळ गावात जाऊन पूरग्रस्तांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.


खचू नका, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत - नाना पाटेकर


नाना पाटेकर पूरग्रस्तांच्या मदतीला धावले असून कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्त भागात 500 घरं बांधणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अजिबात खचून जाऊ नका, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत असल्याचं नानांनी पूरग्रस्तांना सांगितलं. शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयात असलेल्या 2000 पूरग्रस्तांची नाना पाटेकर यांनी भेट घेतली. पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या जेवणाची आणि मेडिकल कॅम्पची नानांनी पाहणी केली. यावेळी पूरग्रस्तांना भात आणि शिऱ्याचंही नानांच्या हस्ते वाटप करण्यात आलं.




शर्मिला ठाकरेंना अश्रू अनावर

शर्मिला ठाकरे यांनी आज पूरग्रस्त भागाचा दौरा केला. सांगलीच्या पलुस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावालाही शर्मिला ठाकरेंनी भेट दिली. या भेटीदरम्यान घटलेल्या दुर्घटनेची माहिती गावकऱ्यांच्या तोंडून ऐकताना शर्मिला ठाकरेंनाही अश्रू अनावर झाले.

महापुराची स्थिती पाहून अंगावर काटा आला - उर्मिला मातोंडकर


सांगलीच्या महापुराची स्थिती पाहून आपल्या अंगावर काटा आला आहे, अशा शब्दात उर्मिला मातोंडकरने आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्य सरकारने पूरग्रस्तांना सर्वोत्तपरी मदत करून पुनर्वसन करणे खूप गरजेचे असल्याचं मत व्यक्त केलं. अनेक ठिकाणी सरकारची मदत पोहचत नाही. त्यामुळे याबाबत सरकारने काळजी घ्यावी, असं आवाहनही उर्मिलाने केलं.



जयदीप ठाकरेही कोल्हापुरात दाखल


दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव जयदेव ठाकरे यांचा मुलगा जयदीप ठाकरे यांनी देखील पूरग्रस्तांची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जयदीप ठाकरेंनी कोल्हापुरातील निवारा केंद्रात पूरग्रस्तांना मदत केली. जयदीप दोन ट्रक भरुन साहित्य घेऊन कोल्हापूरमध्ये आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये ते वस्तूंचे वाटप करणार आहेत. यावेळी स्वतः जयदीप ठाकरे यांनी ट्रकमध्ये साहित्य भरले.