नाशिक : पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरील महाप्रसादाचं ताट नाकारलं, असा वक्तव्य भगवानगडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री यांनी केलं आहे. आज नाशिक येथे नामदेवशास्त्री यांनी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी नामदेवशास्त्री म्हणाले की, जे ताट पंकजा मुंडेंनी नाकारलं, ते त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडेंनी स्वीकारलं.


नामदेवशास्त्री म्हणाले की, भगवानगडावरील महाप्रसादाचं ताट पूर्वी दिवंगत गोपीनाथ मुंडे स्वीकारत होते. त्यानंतर पंकजा मुंडे ते ताट स्वीकारत होत्या. परंतु आता तेच ताट त्यांनी नाकारलं. ते ताट धनंजय मुंडेंनी स्वीकारलं. कारण त्यांच्या रक्तातच भगवान बाबांची भक्ती आहे. नाकारलेला महाप्रसाद धनंजय मुंडेंना मिळाला.

गेल्या काही वर्षात धनंजय मुंडेंनी अनेक अपमान पचवले आहेत. धनंजय मुंडे यांच्यात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार या तिघांचे गुण आहेत. त्यामुळेच त्यांना राजकारणात यश मिळत आहे. दरम्यान, भगवान गडावर कोणत्याही प्रकारचे राजकीय भाषण होणार नाही, हे नामदेव शास्त्री यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

भगवानगडावरील दसरा मेळाव्याच्या वेळी राजकीय भाषणावरुन महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात जो वाद निर्माण झाला होता. त्यावर पडदा जरी पडला असला तरी सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. 'माझा'शी नामदेव शास्त्रींनी एकीकडे धनंजय मुंडेवर स्तुतीसुमनं उधळली, तर दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडेंवर मात्र महाप्रसादाचं ताट नाकारल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी भगवान गडावर राजकीय कार्यक्रम (दसरा मेळाव्यातील भाषण) करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी भगवानगडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री यांच्याकडे परवानगी मागितली होती. परंतु नामदेव शास्त्रींनी परवानगी देण्यास नकार दिला. त्यावेळी पहिल्यांदाच नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे आमने सामने आले होते.

संबंधित बातम्या :


भगवान बाबांच्या जन्मभूमीत दसरा मेळावा, पंकजा मुंडे काय बोलणार?

भगवान बाबांच्या कर्मभूमीत जमलं नाही ते आता जन्मभूमीत जमणार?

मी येत आहे सीमोल्लंघनासाठी... पंकजांकडून दसरा मेळाव्याची अखेर घोषणा

गडावर नव्हे, संत भगवान बाबांच्या जन्मभूमीवर दसरा मेळावा होणार?

भगवानगड दसरा मेळाव्याला जिल्हा प्रशासनानेही परवानगी नाकारली!

पहिली आणि शेवटची विनंती करते, पंकजांचं नामदेव शास्त्रींना पत्र