नागपूर : देशातील चर्चांच्या केंद्रस्थानी असलेल्या नागरिकत्व मुद्द्यावरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे जुने मित्र उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांविरोधात आहे. हा सावरकरांचा अपमान आहे. नागपूरमध्ये विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.


उद्धव ठाकरे म्हणाले की, सिंधू नदीपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या भूमीला एक देश बनवणे, हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्वप्न आणि ध्येय होते. परंतु भाजप सरकार सावरकरांच्या विचारांच्या विरोधात जाऊन सिंधू नदीजवळच्या आणि पाकिस्तानातल्या अल्पसंख्यांकांना भारतात घेऊन त्यांना नागरिकत्व देत आहे. हा सावरकरांचा अपमान आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष ज्या सावरकरांच्या विचारांवर बनला आहे, त्या सावरकरांना हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा मान्य झाला नसता. सध्या देशात महिला सुरक्षा, बेरोजगारी आणि कृषी संकट हे मोठे प्रश्न आहेत. परंतु नागरिकत्व दुरुस्ती कायद्याद्वारे लोकांचे मूळ मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला जातोय.

दरम्यान, माध्यमांनी उद्धव ठाकरेंना राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतरची शिवसेनेची भूमिका काय? महाविकास आघाडीचं भविष्य काय? असे सवाल केले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही (शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी) वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहोत. आम्ही भिन्न विचारांची माणसं आहोत. कालही आमच्या विचारात भिन्नता होती. आजही त्यात भिन्नता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीची भूमिका शिवसेनेने मांडली आहे. मात्र, सरकार चालवण्यासाठी समान कार्यक्रम ठरवला आहे. सरकार म्हणून आमच्यात एकवाक्यता आहे.

शिवसेनेच्या भूमिकेविषयी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्याबद्दल शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. भाजपने आम्हाला सावरकरांच्या मुद्द्यावरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करु नये. मात्र देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यानंतर उफाळलेल्या हिंसाचाराचं काय? असा सवाल त्यांनी भाजप नेत्यांना केला आहे.

पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे?