Cotton News : परतीच्या पावसानं (Rain) राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं पावसामुळं वाया गेली आहेत. या परिस्थितीतून देखील काही शेतकऱ्यांची पिकं कशीबशी वाचली आहेत. मात्र, या वाचलेल्या पिकांवर देखील रोगांचा प्रादुर्भाव होतोना दिसत आहे. वर्धा (Wardha) जिल्ह्यातल्या सेलू (Seloo) तालुक्यात काही ठिकाणी कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं उत्पन्नात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


शेतीला केलेला खर्चही निघणार नसल्यानं शेतकरी चिंतेत


कपाशीच्या पिकांवर लाल्या रोगानं आक्रमण केल्यामुळं कपाशीच्या झाडाची पाने गळत आहेत. अतिवृष्टीमुळं खचलेला शेतकरी आता या रोगाच्या प्रादुर्भावामुळं चिंतेत दिसत आहे. दोन महिने झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी आणि तुरीचं मोठं नुकसान झालं आहे. यातून काही ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठी काळजी घेऊन कपाशीची रोपटे कशीबशी वाचवली होती. दरवर्षी शेतकऱ्यांना एकरी तीन ते चार पोत्यांचा उतारा निघत असतो. आता मात्र, शेतीला केलेला खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.


महागडी औषध फवारणी करुन जगवली पिके 


यंदा पावसामुळं पेरणी उशिरा झाली आहे. अशातच अतिवृष्टमुळं पिकं जगतील की नाही, या विवंचनेत शेतकरी होता. अशातच अतिवृष्टी झाल्यानंतरही सेलू तालुक्यातील काही भागातील सोयाबीन, कापूस पिके शेतकऱ्यांनी महागडी औषधांची फवारणी करुन जगवली. शेतात पाणी साचल्यानं तण अधिक वाढले होते. कापसात निंदणं होत नसल्यानं फवारणी करण्याशिवाय पर्यायच नव्हता. यामुळं शेतकऱ्यांचा यावर्षी फवारणीचा खर्च अधिक वाढला. अशातच आता जगलेल्या कापूस पिकाला उत्तम बोंडे धरल्याने शेतकऱ्यांची उत्पन्नाची आस अद्यापही कायम आहे. मात्र, अशातच पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.


पिकं बोंड धरण्याच्या अवस्थेत असतानाच लाल्या रोगाचं आक्रमण 


बोंड धारण्याच्या अवस्थेत असतानाचं सेलू तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या कापूस पिकावर लाल्या रोगानं आक्रमण केलं आहे. यामुळं रोपट्यांची पाते गळून याचा परिणाम बोंडावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच जमिनीत ओलावा आहे. परंतू लाल्या रोगानं कपाशी पिकावर आक्रमण केल्यामुळं उत्पादन घट होण्याचे चिन्हे दिसत आहे.  आधीच परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला होता. त्यातून देखील शेतकऱ्यां त्यांची पिकं वाचवली आहेत. अशा स्थितीत पुन्हा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Nandurbar : स्थलांतर झाल्यानं नंदूरबार जिल्ह्यात मजुरांची टंचाई, शेतकरी हैराण, शेती कामासाठी मजुरांची शोधाशोध