सोलापूर : राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात झालेल्या 385 कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी हवाला पैशांविरोधातील विशेष न्यायालयाने आमदार रमेश कदम आणि इतरांच्या 50 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्याचा आदेश दिले आहेत. कदम हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील राष्ट्रवादीचे आमदार आहेत.


ईडीने कदम आणि इतरांविरोधात 15 सप्टेंबर 2015 मध्ये हवाला पैसा व्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हेगारी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मालमत्ता जप्तीचे तात्पुरते आदेश गेल्या मार्च महिन्यात जारी करण्यात आले होते. गुन्हे अन्वेषण विभागाने या अपहार प्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरनुसार ईडीने तक्रार दाखल केली होती.

कदम हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे ऑगस्ट 2012 ते डिसेंबर 2014 या कालावधीत अध्यक्ष होते. या दरम्यान कदम आणि इतरांनी महामंडळाच्या पैशांचा मोठ्या प्रमाणावर अपहार केला, असा आरोप ईडीने केला होता.

ईडीने कदम आणि इतरांचे मुंबईतील फ्लॅट, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतजमीन व बँकेतील शिल्लक जप्त करण्याचा हंगामी आदेश दिला होता. जप्त मालमत्तेची किंमत सुमारे 50 कोटी असली तरी प्रत्यक्षातील किंमत ही 120 कोटींपेक्षा जास्त असल्याचं ईडीने म्हटलं आहे.

रमेश कदम यांना गेल्या वर्षी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने पुण्यात अटक केली होती. सध्या ते तुरुंगात आहेत.