मुंबई : चलनात 10 रुपयांची बनावट नाणी असल्याच्या अफवेला रिझर्व बँक ऑफ इंडियाने पूर्ण विराम दिला आहे. चलनात असलेली 10 रुपयांची नाणी बनावट नसून या केवळ अफवा आहेत, असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. ‘₹’ चिन्ह असणारी आणि नसणारी दोन्हीही नाणी खरे असल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं आहे.


अनेक दुकानदार, व्यापारी यांच्याकडून 10 रुपयांची नाणी स्वीकारली जात नसल्याची तक्रार आरबीयला मिळाली. त्यानंतर आरबीआयने एका सुचनेद्वारे ही नाणी खरी असल्याचा खुलासा केला.

आरबीआयने या प्रकारच्या अफवांवर दुर्लक्ष करण्याचं आवाहन केलं आहे. सध्या चलनात असणारी सर्व नाणी खरी आहेत. त्यामुळे कुणीही मनात शंका न आणता ही नाणी वापरावी, असा सल्ला आरबीआयने दिला आहे.

नोटाबंदीनंतर बाजारात सुट्ट्या चलनाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. नागरिकांकडून सुट्ट्या पैशांचा अभाव भरुन काढण्यासाठी 10 रुपयांच्या नाण्याचा वापर केला जातो. मात्र ही नाणी खोटी असल्याची अफवा पसरल्यामुळे अनेक ठिकाणी नाणी स्वीकारली जात नसल्याचं समोर आलं आहे.