नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. राहुल गांधींनी सावरकरांबाबतच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी भाजपने लावून धरली आली. 'सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा धिक्कार असो', 'स्वातंत्र्यवीर सावरकर का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान' अशा घोषणा भाजप आमदारांनी दिल्या. भाजपच्या सर्व आमदारांनी 'मी सावरकर' नावाच्या भगव्या टोप्या घातल्या होत्या.


राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अनुद्गार काढले आहेत. त्याबद्दल राज्यभर आणि देशभर संतापाची लाट आहे. हा विषय आपल्याला लावून धरायचा आहे. सावरकरांशी संबंध काँग्रेसने तोडला असेल, देशातील जनतेने सावरकरांशी संबंध तोडलेला नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तर सावरकरांची बदनामी करणे देश आणि महाराष्ट्र सहन करणार नाही. तसेच शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली.


माजी विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. पायऱ्यांवर घोषणा देणे, आंदोलन करणे माझ्यासाठी नवीन नाही. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सावरकारांचं मोठं योगदान आहे आणि त्याबद्दल लोकांमध्ये आदराची भावना आहे. राष्ट्रीय नेते हे कोणत्या राजकीय पक्षाचे नसतात. त्यामुळे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा देशभरातून निषेध होत आहे. राहुल गांधींची भूमिका चुकली आहे. जनतेच्या भावनेचा आदर करत राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.


काय म्हणाले होते राहुल गांधी?


देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवर बोलताना राहुल गांधी यांनी देशाचा उल्लेख 'रेप इन इंडिया' केला होता. या वक्तव्यावरून राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली होती. त्यावर काँग्रेसच्या 'भारत बचाओ' रॅलीत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. "मी माफी मागणार नाही. मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे", असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. मी मरेन मात्र माफी मागणार नाही. नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागायला हवी. मोदींचे असिस्टंट अमित शाह यांनी देशाची माफी मागायला हवी, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.