उस्मानाबाद : उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी विजय मिळवला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाला आहे. धस यांचा विजय राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का मानला जातो आहे.


सुरेश धस यांनी अशोक जगदाळे यांच्यावर 76 मतांनी मात केली आहे.

भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना 527 मतं, राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना 451 मतं मिळाली.  25 मतं बाद ठरली. सांकेतिक आकडे लिहिलेले असल्यानं 25 मंत बाद झाल्याची माहिती मिळते आहे.

सुरेश धस आणि पराभूत उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात मतांवरुन वाद झाला आहे. अशोक जगदाळे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या व राज्याच्या महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची केली होती. यात पंकजा मुंडे यांनी बाजी मारली असून, धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे.

उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषद निवडणूक अंतिम निकाल

527 सुरेश धस

451 अशोक जगदाळे

25 बाद

एकूण फरक 76

सुरेश धस विजयी घोषित

चुरशीची निवडणूक

लातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात होती. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली होती. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत होते. राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे  यांना पाठिंबा द्यावा लागला होता.

LIVE UPDATE :

- राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांच्याकडून फेरमतमोजणीची मागणी

- भाजपचे उमेदवार सुरेश धस विजयी

- भाजपचे उमेदवार सुरेश धस 40 मतांनी आघाडीवर

- राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे पिछाडीवर

- पहिल्याच फेरीमध्ये निकाल हाती येणार

-  मतमोजणीला सुरुवात, भाजपाचे सुरेश धस आणि राष्ट्रवादी प्रणित अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात चुरस

उस्मानाबाद : उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करून मोजणी करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे.

आज सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये विधानपरिषद निकालाच्या अनुषंगाने 5 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. औरंगाबाद खंडपीठाने यातील एक याचिका फेटाळत चार याचिका निकाली काढल्या. तसंच या विधानपरिषदेची मतमोजणी तत्काळ करण्याचे आदेश दिले आहेत.

याशिवाय राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करुन मोजणी करावी असे आदेशही खंडपीठाने दिले. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे.

औरंगाबाद खंडपीठात गणेश वाघमारे यांनी याचिका दाखल करून मतमोजणी करावी अशी मागणी केली. तर खंडपीठाच्या आदेशाप्रमाणे गोपनीयतेचा भंग होतो. त्यामुळे बीड जिल्ह्यातील 10 सदस्यांची मते ही वेगळी न करता सर्व मतांसोबतच मोजणी करावी अशी मागणी करणारी याचिका अमर नाईकवाडे यांनी दाखल केली होती.

या मतदारसंघासह राज्यातील सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक झाली. मात्र ही जागा वगळता सर्व जागांचे निकाल 24 मे रोजी जाहीरही झाले.

या मतदारसंघातील दहा सदस्यांना पालिकेत कचरा टाकल्याने निलंबित करण्यात आलं. मात्र त्यांना मतदानाचा हक्क द्यायचा की नाही, ते त्यांची मतं निकालात ग्राह्य धरायची की नाही असा सर्व वाद न्यायालयात गेला.

हे प्रकरण न्यायालयात गेल्याने, इथला निकाल अजून जाहीरच झालेला नाही. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने स्थगित केलेली बीड-उस्मानाबाद-लातूर विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया 11 जूनपर्यंत पूर्ण करा, अशा सूचना मुख्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या.

निकाल लांबणीवर का पडला?

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेचा निकाल बीड नगरपालिकेतील अपात्र दहा सदस्यांमुळे लांबणीवर पडला. या निवडणुकीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात चुरस पहावयास मिळाली होती.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक झाली होती. 24 मे रोजी सर्व निकाल जाहीर करण्यात आले. मात्र बीड-उस्मानाबाद-लातूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी झालीच नाही. बीड नगरपालिकेच्या दहा सदस्यांना पालिकेत एका आंदोलनादरम्यान कचरा टाकला म्हणून मंत्री रणजीत पाटील यांनी अपात्र ठरविले होते. पाटील यांचे आदेश रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

काय आहे प्रकरण?

बीड नगर परिषदेच्या दहा सदस्यांना पालिकेत कचरा टाकला म्हणून राज्यमंत्री रणजित पाटील यांनी अपात्र ठरवलं. निवडणूक आयोगाने मात्र त्यांना मतपत्रिका यापूर्वी तयार झालेल्या असल्याने मतदानाचा अधिकार दिला होता.

राज्यमंत्र्यांचे आदेश रद्द करण्यासाठी बीड - नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्यासह नऊ अपात्र घोषित नगरसेवकांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. शिवाय याविरोधात दुसरीही एक याचिका दाखल करण्यात आली होती.

खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी दहा अपात्र नगरसेवकांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सोमवारी भाग घेण्यास परवानगी दिली. या दहा नगरसेवकरांच्या मतांचा निवडणुकीवर परिणाम होत असेल, तर निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येऊ नये. निवडणुकीचा निर्णय याचिकेच्या अंतिम निकालास अधीन राहील, असं स्पष्ट करण्यात आलं.

बीड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष हेमंत रविंद्र क्षीरसागर, प्रभाकर पोकळे, सय्यद फारूख, युवराज जगताप, रमेश चव्हाण, अमर नाईकवाडे, सम्राटसिंह चव्हाण, हाश्मी इद्रीस, मोमीन अझरोद्दीन आणि रणजीत बनसोडे यांनी नगराध्यक्षांच्या दालनात कचरा टाकल्याने त्यांना अपात्र घोषित करण्यात आलं होतं.

निर्णयाला हायकोर्टात आव्हान

याविरोधात अॅड. सतीश तळेकर यांच्यावतीने खंडपीठात आव्हान देण्यात आलं. राज्यमंत्र्यांचा निर्णय रद्द करण्यात यावा आणि तूर्तास त्याला स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली होती. मतदार यादी 3 मे 2018 रोजी अंतिम झाली आणि निवडणूक प्रक्रियेला 20 एप्रिल 2018 पासून सुरूवात झाली.

एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यास त्यात हस्तक्षेप केला जाऊ नये, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे.

दुसऱ्या याचिकेत निवडणूक आयोगाने मतदान करण्यास दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. राज्यमंत्र्यांच्या अपात्रतेच्या 18 मे रोजीच्या आदेशाची प्रत 19 मे रोजी सायंकाळी मिळाली असल्याचं अॅड. तळेकर यांनी सांगितलं. यावर सुनावणी करताना कोर्टाने या दहा नगरसेवकांची मतं वेगळी ठेवण्याचा निर्णय दिला.

बीडमध्ये प्रतिष्ठेची लढत

लातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात आहे. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली आहे.

या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे.

राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली.

त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे  यांना पाठिंबा द्यावा लागला.

संबंधित बातम्या

 बीड-उस्मानाबाद-लातूर विधानपरिषदेचा निकाल 11 जूनपर्यंत

उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषद : मतमोजणी पुढे ढकलली! 

शंभर ते दीडशे मतांच्या फरकाने निवडून येणार : सुरेश धस


बीड-उस्मानाबाद-लातूरमध्ये एका मताची किंमत पाच लाख रुपये? 

बीडच्या दहा निलंबित नगरसेवकांना मतदान करता येणार, पण...