मुंबई : महाराष्ट्रात पुढील 24 तासात सर्वदूर चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पालघर आणि ठाण्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघरमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर ठाण्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे.


 मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरण बघायला मिळात आहे. सकाळपासून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी देखील कोसळल्या. मात्र, दुपारनंतर दक्षिण मुंबई काही ठिकाणी ऊन- पावसाचा खेळ सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून सांगण्यात आला आहे. तर तिकडे दक्षिण कोकणात देखीलचांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. 


विदर्भात पावसाची हजेरी


विदर्भात देखील अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी बघायला मिळत आहे. ज्यात नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आला आहे. काल देखील पश्चिम आणि पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि बुलढाणा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. ज्यात अनेक ओढे आणि नाले दुथडी भरुन वाहू लागले होते. वाशिम जिल्ह्यात देखील काही ठिकाणी आज चांगला पाऊस अपेक्षित आहे, तसा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. 


 मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता


 मराठवाड्यात देखील आज काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील काही तासात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, बीड आणि उस्मानाबादेतील काही ठिकाणी विजांसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल देखील मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात चांगला पाऊस बघायला मिळाला. या पावसामुळे काही अंशी का होईना पेरणी केलेल्याशेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 


उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज


उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आली आहे. पुढील 3-4 तासात नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काल देखील उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाची हजेरी बघायला मिळाली. मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सातारा आणि सांगलीत देखील मुसळधारेची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रात चांगला पाऊस होत आहे अशातच सर्वदूर पावसाने शेतकरी राजाला यामुळे दिलासा मिळणार आहे.