Nagpur News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील (RTMNU) एका प्राध्यापकाकडून विविध विभागातील सात प्राध्यपकांना ब्लॅकमेल करुन 15 लाखांपेक्षा जास्त रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप होता. यासंदर्भात लेखी तक्रार असूनही आठ दिवसांपासून मौन धारण केलेल्या विद्यापीठ प्रशासनाकडून अखेर स्पष्टीकरण  देण्यात आला आहे. माध्यमांमध्ये बातम्या झळकताच विद्यापीठाचे (Vice Chancellor) कुलगुरु सुभाष चौधरी (Subhash Chaudhari) यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींना शिक्षा देऊ असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


तसेच लैंगिक छळाची कोणत्याही प्राध्यापकाविरोधात कुठलीही तक्रार विद्यापीठाकडे प्राप्त झाली नसून खंडणी मागितल्याचा आरोप असलेला तो प्राध्यापक लैंगिक छळ निवारण समितीचा सदस्यही नसल्याचा खुलासा कुलगुरुंनी केला आहे.


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) एका प्राध्यापकाने इतर सात प्राध्यापकांकडून खंडणी मागितल्याच्या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने धक्कादायक खुलासा केला आहे. तक्रार करणाऱ्या सातही प्राध्यापकांविरोधात आमच्याकडे लैंगिक छळाची कुठलीही तक्रार आलेली नसल्याचा स्पष्टीकरण दिल्याने खळबळ उडाली आहे. ज्या प्राध्यापकाने सात प्राध्यापकांना भीती दाखवून खंडणी वसूल केली होती, तो लैंगिक छळ निवारण समितीचा सदस्यही नाही अशी माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांनी दिली आहे.


विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारी पदाचा कार्यभार काढला


एवढेच नाही तर खंडणी मागणाऱ्या त्या प्राध्यापकाकडून विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण मागितले आहे.  त्यांचे स्पष्टीकरण आल्यानंतर या खंडणी प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली जाईल. त्या प्राथमिक चौकशीत खंडणीचे पुरावे आढळल्यानंतर विभागीय चौकशी ही केली जाईल असे कुलगुरु म्हणाले. तात्पुरती शिक्षा म्हणून खंडणी मागणाऱ्या त्या कथित प्राध्यापकाकडून विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारीपदाचा कार्यभारही काढून घेण्यात आल्याची माहिती कुलगुरुंनी दिली. दरम्यान उच्चशिक्षित असलेल्या सातही प्राध्यापकांनी त्यांच्याविरोधात कोणतीही तक्रार नसताना लाखो रुपये खंडणी मागणाऱ्या प्राध्यापकाला का द्यावे, असा प्रश्नही कुलगुरुंनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींना शिक्षा केली जाईल, अशी हमी कुलगुरु डॉ चौधरी यांनी दिली. दरम्यान, खंडणी प्रकरणी तक्रार करणाऱ्या पीडित प्राध्यापकांनी या विषयावर प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिले आहे.


काय आहे प्रकरण?


प्राध्यापकांच्या तक्रारीनुसार, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आणि प्राध्यापक यांनी सातही प्राध्यापकांना काही मुलींनी तुमच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन लीगल सेलची तथ्यशोधन समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात दोन वकिलांसह माझाही समावेश असल्याची भीती दाखवली. दोन्ही वकील माझे चांगले मित्र आहेत. मी तुम्हाला बाहेर काढतो, अशी बतावणी केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. सोबतच या सर्वासाठी खर्च करावा लागणार असल्याचेही सांगितले. प्रत्येकी 10 लाख जमा करण्याची ताकीद दिली. त्यानंतर काहींना सात तर काहींनी पाच लाख रुपये देण्याचे निश्चित झाले. 2 लाख रुपये ज्युनिअर तर 5 लाख रुपये वरिष्ठ वकिलाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. प्राध्यापकांनी सर्व मिळून 15.50 लाख रुपये दिले. त्यानंतरही आणखी पैशांची मागणी केली जात होती. पैसे दिले नाही तर प्रकरण पुन्हा बाहेर काढण्याची धमकी दिली होती.


ही बातमी देखील वाचा


मुख्यमंत्री घटनास्थळीच होते, आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा कसा, सरकार आणि पोलिसांना जाब विचारु : जयंत पाटील