मीच तो पाहुणा, बनाव रचून दोघा भामट्यांचा कारसह पोबारा
एबीपी माझा वेब टीम | 19 Jul 2017 06:08 PM (IST)
'थ्री इडियट्स' चित्रपटातल्या एका सीनसारखी घटना नागपुरातल्या रेल्वे स्थानकावर घडली. पाहुणे असल्याचा बनाव करुन दोघांनी कारसह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नागपूर : 'थ्री इडियट्स' चित्रपटातल्या एका सीनसारखी घटना नागपुरातल्या रेल्वे स्थानकावर घडली. पाहुणे असल्याचा बनाव करुन दोघांनी कारसह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागपूरच्या नामांकित तुली इंपिरियल हॉटेलमध्ये 15 जुलै रोजी संतोष कुमार नावाचे पाहुणे उतरणार होते. त्यांच्यासाठी हॉटेलमध्ये आलिशान रुम बुक होती. निश्चित वेळेत त्यांना आणण्यासाठी हॉटेलची इनोव्हा कार नागपूर रेव्ले स्थानकावर गेली. चालक भारत राऊत बराच वेळ हातात संतोषकुमार यांच्या नावाची पाटी घेऊन उभा राहिला. मात्र कोणीच आलं नाही. अखेर वैतागून चालकाने हॉटेलला फोन केला, मात्र हॉटेल व्यवस्थापनाने येणारे पाहुणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने चालकाला तिथेच थांबायला सांगितलं. अखेर दोन व्यक्ती येऊन बसल्यावर कार हॉटेलच्या दिशेने निघाली.. वाटेत आपले फोन बंद असल्याचा बहाणा केला आणि एकाने ड्रायव्हरचा फोन घेऊन कॉल केला. मध्येच दारु घेण्याच्या बहाण्याने गाडी एका वाईन शॉपजवळ थांबवली. ड्रायव्हर वाईन शॉपमध्ये गुंतल्याचं पाहून दोघांनीही गाडीसकट पोबारा केला. या घटनेनंतर पोलिसांनी अख्खं नागपूर पिंजून काढलं, सीसीटीव्ही फुटेज तपासलं, पण गाडीचा पत्ता मात्र लागला नाही. त्यामुळे यापुढे अनोळखी पाहुण्यांना गाडीत बसवण्याआधी चार वेळा खात्री करुन घ्या.