नागपूर : एकाच दिवसात झालेल्या चार हत्यांमुळे नागपूर हादरलं आहे. एक महिला, दोन तरुण आणि एका गुन्हेगाराची 12 तासांच्या कालावधीत निर्घृण हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
नागपुरातील नरसाळा भागात एका तरुणाची हत्या झाल्याचं शनिवारी सकाळी उघडकीस आलं आहे. पंकज तिवारीची भररस्त्यात धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याचा आरोप आहे.
नागपुरातील वाथोडा परिसरात शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हरीश बावनेची हत्या करण्यात आली. 5 ते 6 हल्लेखोरांनी हरिशला घेरुन धारदार शस्त्रानी भोसकून हत्या केल्याची माहिती आहे. खुनाचे आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं वृत्त आहे.
तिसऱ्या घटनेत निलेश कवरत्ती या गुन्हेगाराला ठार मारण्यात आलं. नागपुरातील मरारटोली भागात 4 हल्लेखोरानी धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या केली. गुन्हेगांराच्या टोळीयुद्धातून हत्याकांड घडल्याचं म्हटलं जात आहे.
जरीपटका भागात लवप्रीत सिंह मोहोर या महिलेची तिच्या पतीनेच गळा आवळून हत्या केली आहे. कौटुंबिक वादातून हत्या घडल्याची प्राथमिक माहिती आहे.