नागपूर : शुभमच्या हत्येप्रकरणी बारमधील 6 कर्मचाऱ्यांना अटक
एबीपी माझा वेब टीम | 23 Nov 2016 07:56 AM (IST)
नागपूर : नागपुरातील शुभम महाकाळकरच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी क्लाऊड सेव्हन बारच्या 6 कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. मात्र बारमालकाच्या मुलावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप असलेले अभिजीत खोपडे आणि रोहित खोपडे या आमदार कृष्णा खोपडेंच्या दोन्ही मुलांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे पोलीस तपासात पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप होत आहे. रविवार 20 नोव्हेंबरच्या रात्री भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा अभिजीत खोपडे आणि क्लाऊड सेव्हनच्या बारमधल्या कर्मचाऱ्यांची भांडणं झाली. त्या भांडणात अभिजीत खोपडेनं बारची तोडफोड केल्याचा आरोप आहे. त्याचवेळी अभिजीतनं आपला धाकटा भाऊ रोहित खोपडेला आपल्या मदतीसाठी बोलावलं. रोहितसोबत असलेला शुभमही बारमध्ये पोहोचला आणि पुन्हा एकदा भांडणाला तोंड फुटलं. बारमधल्या कर्मचाऱ्यांनी शुभम आणि अभिजीतच्या गाडीची तोडफोड केली. बारमधून बाहेर पडल्यानंतर बार कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करुन अर्धा किलोमीटर अंतरावर लक्ष्मीभुवन परसरात गाठलं. तिथेच त्याची भोसकून हत्या केल्याचा आरोप शुभमच्या परिवाराने केला आहे. या भांडणाशी कोणताही संबंध नसलेल्या शुभमला या प्रकरणात जीव गमवावा लागल्यानं नातेवाईकांमध्ये संतापाची भावना आहे.