नागपूर: 'मुझे आप एक नाईट चाहिए' अशा निर्लज्ज भाषेत विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाला चांगलाच चोप देण्यात आला.


परीक्षेचं जप्त केलंल हॉल तिकीट परत देण्याच्या मोबदल्यात, शिक्षकाने हे हीन कृत्य केलं.

महत्त्वाचं म्हणजे मुलीने या नराधम शिक्षकाचा फोन कॉल रेकॉर्ड केल्यामुळे त्याचं बिंग फुटलं. त्यामुळेच रंगेहाथ सापडलेल्या या शिक्षकाला युवा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं.

काय आहे प्रकरण?

संबंधित तरुणी नागपूरच्या एका नामांकित महिला महाविद्यालयात बॅचलर ऑफ ब्युटी कल्चर अॅण्ड हेयर डिझायनिंगचा अभ्यास करते.

या विद्यार्थिनीला प्रथम वर्षाच्या परीक्षेसाठी धरमपेठ पॉलिटेक्निक हे परीक्षा केंद्र मिळाले होते. 13 एप्रिलला संबंधित अभ्यासक्रमाचा पेपर होता.

त्यावेळी परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना मोबाईल स्विच ऑफ करुन ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र संबंधित तरुणीचा मोबाईल चुकून ऑन राहिला.

त्यामुळे मोबाईलच्या मदतीने संबंधित तरुणी कॉपी करत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला. तसंच हा मोबाईल धरमपेठ पॉलिटेक्निकमधील प्राध्यापक अमित गणवीरकडे सोपवला.

मात्र, प्राध्यापक गणवीरने तो फोन विद्यार्थिनीला परत करताना तीचे हॉल तिकीट ठेऊन घेतले.

विद्यार्थिनीचा आरोप 

पेपर संपल्यानंतर विद्यार्थिनी हॉल तिकीट आणण्यासाठी प्रा. गणवीरकडे गेली. मात्र प्रा. गणवीरने अश्लिल संभाषण करुन शरीरसुखाची मागणी केल्याचा दावा, विद्यार्थिनीचा आहे.

दरम्यान, प्रा. गणवीरने हॉल तिकीट न दिल्याने पुढील पेपर कसे द्यायचे या विवंचनेतून, संबंधित विद्यार्थिनीने सर्व प्रकरण मैत्रीण आणि नातेवाईकांना सांगितला.

मग संबंधित विद्यार्थिनी आणि तिच्या मैत्रिणींनी मिळून, प्रा. गणवीरचा नालायकपणा पुराव्यासह जगासमोर आणण्याचं ठरवलं. त्यांनी प्रा. गणवीरला फोन करुन हॉल तिकीट परत देण्याची विनंती केली.

तेव्हा प्राध्यापक गणवीरने थेट एका रात्रीसाठी शरण येण्याची निर्लज्ज मागणी केली.

"आयकार्ड मैं दे दूंगा आपको... आयकार्ड मेरे ही पास है... सॅटर्डे को मिलो... सॅटर्डे को आपके मम्मी पापा भी नही होंगे... घर पर आप अकेले ही होंगे... मुझे एक नाईट चाहिये आप...."

अशी मागणी शिक्षकाने विद्यार्थिनीकडे केली. हा सर्व कॉल विद्यार्थिनीने रेकॉर्ड केला आणि प्रा. गणवीरचा नालायकपणा जगासमोर आला.

युवा क्रांती दलाकडून चोप

प्राध्यापक गणवीर एका परीक्षार्थी मुलीच्या अडचणींचा असा गैरफायदा घेत असल्याचं समजल्यावर, युवा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

या कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्याही कार्यकर्त्यांनी धरमपेठ पॉलिटेक्निक महाविद्यालयात जाऊन प्राध्यापक गणवीरला चांगलाच चोप दिला. इतकंच नाही तर त्यांनी गणवीरच्या तोंडालाही काळे फासलं.



पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेत आरोपी प्राध्यापकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

दरम्यान, कायदा हातात घेत गुंडगिरी करणाऱ्या युवा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांच्याविरोधातही दंगल आणि मारहाणीचा गुन्हा नोंदविला आहे.

जप्त केलेले हॉल तिकीट परत करण्याच्या नावाखाली शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्राची मान शरमेने खाली गेली आहे. मुली महाविद्यालयात गुरुजनांच्या संरक्षणात ही सुरक्षित नाहीत का असा सवाल या घटनेतून उपस्थित होत आहे.