लातूर : मारहाण प्रकरणामुळे चर्चेत आलेले उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लातूर शहरातील एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे रवींद्र गायकवाड यांनी अचानक आंदोलन केलं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
बँक प्रशासन आणि सरकारमध्ये समन्वय नसल्याने एटीएममधून पैसे मिळत नसल्याचा आरोप रवींद्र गायकवाड यांनी केला. त्यांनी अचानकपणे आंदोलन केल्याने पोलीस प्रशासनाचीही धावपळ उडाली.
शाहू कॉलेज परिसरातील बँक ऑफ इंडिया, बडोदा बँक, हैदराबाद बँकच्या एटीएमसमोर आंदोलन केलं. मात्र यावेळी गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे आणि पोलीस उपनिरीक्षक सत्यवान हाके तिथे हजर होते.
पोलिसांनी आंदोलन आवरतं घेण्याविषयी सांगितलं असता खासदार रवींद्र गायकवाड यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. खासदारासमोर हतबल झालेले पोलीसही ऐकून घेत जागीच उभे राहिले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.