नागपूर : गेले चार दिवस अंबाझरी पोलिस ठाण्याच्या समोर पोलिसांच्या नाकर्तेपणाविरोधात आंदोलन करत बसलेल्या तरुणीच्या लढयाला अखेर यश आले आहे. पीडित तरुणीने आरोप केलेल्या पोलिस उप-निरीक्षकावर अखेर मारहाण, विनयभंग आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आले. एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर याबाबत पावलं उचलण्यात आली.


मात्र, त्याचवेळी पोलिस उपनिरिक्षकाच्या तक्रारीवरुन पीडित तरुणीविरोधातही घरात घुसणे, मारहाण करणे, धमकावणयाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

जोपर्यंत तक्रार नोंदवून आरोपी पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंदविला जात नाही, तोपर्यंत पोलिस ठाण्यासमोरुन उठणार नाही, असा निर्धार करत पीडित तरुणीने नागपुरात पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरु केले होतं. गेले चार दिवस दिवस-रात्र सुरु असलेल्या तिच्या ठिय्या आंदोलनाला एबीपी माझाच्या बातमीमुळे यश आले आहे.

प्रकरण काय आहे?

पीडित तरुणीची नागपूरात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकासोबत 2015 मध्ये मैत्री झाली होती. पीडित तरुणीच्या आरोपानुसार, संबंधित पोलिस अधिकाऱ्याने 2016 मध्ये लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर लग्नास नकार देत तिला भेटणे बंद केले.

सप्टेंबर 2016 मध्ये पीडित तरुणीने पोलिस अधिकाऱ्याविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दिली. तेव्हा पोलिसांनी स्वतःच्या अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल तर केला. मात्र, आरोपी पोलिस अधिकाऱ्याला अटक केली नाही.

इतकेच नाही तर पीडित तरुणीची तक्रार येऊन आणि गुन्हा दाखल होऊन सात महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही पोलिसांनी आपल्याच अधिकाऱ्याच्या विरोधात दाखल झालेल्या बलात्काराच्या या प्रकरणात कोणतेही तपास न करता आजवर चार्जशीटही दाखल केली नाही. खरंतर नियमाप्रमाणे तीन महिन्याच्या आत चार्जशीट दाखल करणे आवश्यक असतं.

आधीच्या तक्रारींवर पोलिस काहीच करत नाही आणि आता जुने प्रकरण मागे घेण्यासाठी आरोप लागलेला पोलीस अधिकारी मारहाण करतो आहे, असा आरोप करत पीडित तरुणीने थेट गांधीगिरी सुरु केली आणि चार दिवसांपासून पोलीस ठाण्यासमोरच एका बेंचवर ठाण मांडलं.

दुसऱ्या बाजूला आरोप लागलेल्या पोलिस अधिकाऱ्याने सर्व आरोप फेटाळून लावत तरुणी खोटे आरोप करत असल्याचा दावा केला.

चार दिवसांपासून पोलीस ठाण्याच्या समोर सुरु असलेली पीडित तरुणीची गांधीगिरी नागपुरात चर्चेचा विषय ठरल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष घालत पीडित तरुणीला तिचे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, तरीही पीडित तरुणी पोलीस ठाण्याच्या समोरून उठायला तयार नव्हती

दरम्यान, बलात्काराची तक्रार येऊन 7 महिने लोटल्यानंतरही तपास पुढे का सरकला नाही आणि नियमाप्रमाणे 90 दिवसात चार्जशीट का दाखल झाली नाही याचं कोणतंही उत्तर सध्यातरी पोलिसांकडे नाही.