नागपूर : मनमोहन सिंह यांच्यासारख्या चारित्र्यवान नेत्याचा पाकिस्तानशी संबंध जोडताना भाजपला शरम वाटली पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. नागपुरात हिवाळी अधिवेशाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने जनआक्रोश हल्लाबोल मोर्चाचं आयोजन केलं होतं.


झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी हल्लाबोल मोर्चा आयोजित केल्याचं शरद पवारांनी सांगितलं.

मनमोहन सिंह हे चारित्र्यवान नेते आहेत. पाकिस्तानच्या मदतीने गुजरात निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपने केला. निवडणुका जिंकण्यासाठी असे आरोप करणं चुकीचं आहे. पाकिस्तानसोबत कारस्थान करत असल्याचा आरोप करताना सरकारला शरम वाटली पाहिजे, असा घणाघात शरद पवारांनी केला.

कर्जमाफी देणार आहोत असं म्हणता, पण कधी देणार? असा सवालही शरद पवारांनी उपस्थित केला. साडेतीन वर्ष झाली, कर्जमाफीचा पत्ता नाही, असं म्हणत सरकारने फसवल्याचा आरोपही पवारांनी यावेळी केला. काँग्रेस सरकारनं 70 हजार कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं होतं, असा दावाही पवारांनी केला.

सरकार जर जनतेच्या उपयोगी येत नसेल, तर कर्जमाफी मिळेपर्यंत सरकारचं कोणतंही देणं आम्ही देणार नाही, कोणतीही वीज बील देणार नाही, असा निश्चय करा, हा मोर्चा इथेच थांबवू नका, आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरुच ठेवा, असं आवाहन पवारांनी हल्लाबोल मोर्चाच्या मंचावरुन केलं.