नागपूर : मिहानमध्ये होणारा सॅफ्रन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर त्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसतंय. असं असलं तरी राज्यातील सत्तानाट्याच्या काळातच सॅफ्रन प्रकल्प हैदराबादमध्ये करण्यावर निश्चिती झाल्याची माहिती समोर आली आहे. सॅफ्रनचे सीईओ आणि देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची 5 जुलैला दिल्लीत भेट झाल्याची माहिती पीआयबीच्या हवाल्याने मिळाली आहे. 


एकीकडे राज्यात सत्तानाट्य सुरू असताना दुसरीकडे नागपूरमध्ये होणारा सॅफ्रन प्रकल्प हैदराबादला जात होता. सॅफ्रनचे सीईओ आणि देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या बैठकीत यावर निश्चिती झाली. ही भेट 5 जुलै रोजी झाल्याचं पीआयबीने म्हटलं आहे. 


सॅफ्रन कंपनीकडून नागपूर आणि हैदराबादमध्ये केवळ जागेची पाहणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संरक्षण मंत्र्यांच्या भेटीनंतर हा प्रकल्प हैदराबादमध्ये करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. 


500 ते 600 कुशल कामगारांचा रोजगार गेला


विमान आणि रॉकेटचे इंजन बनवणारी फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रनने महाराष्ट्रातून काढता पाय घेत आपला विमान इंजन दुरुस्ती देखभालचा प्रकल्प हैदराबादलामध्ये वळवला आहे. सॅफ्रन कंपनी नागपूरच्या मिहानमध्ये विमान इंजनाच्या देखभाल दुरुस्तीचा युनिट टाकणार होती. वर्षाला इथे 250 विमानांची इंजन दुरुस्ती व  देखभाल केली जाणार होती.  त्यासाठी कंपनीची 1 हजार 115 कोटींची प्राथमिक गुंतवणुकीची तयारी होती. या प्रकल्पाच्या माध्यमातून पाचशे ते सहाशे कुशल कामगारांना रोजगार मिळणार होता. मात्र, हा रोजगार आता गेला आहे. प्रशासकीय विलंबामुळे हा प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती मिळत आहे. कंपनीचे सीईओ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन प्रकल्प हैदराबादला हलवण्याची माहिती दिली आहे.