नागपूर : आगामी महापालिका निवडणुका, सर्जिकल स्ट्राईकचं यश आणि बदललेला गणवेश या पार्श्वभूमीवर यंदा संघाच्या दसऱ्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट स्वयंसेवक पूर्ण गणवेशात विजयादशमीच्या संचलनाला हजेरी लावणार आहेत.


रेशीमबागेतल्या हेडगेवार स्मृती मंदिरासमोर नवीन गणवेशात विजयादशमीच्या पूर्वसंध्येला स्वयंसेवकांनी पथसंचलनाचा सराव केला. आतापर्यंत संघाच्या स्वंयसेवकांचे तब्बल 10 हजारांहून अधिक नवे गणवेश विकले गेले आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पथसंचलनानंतर व्यायाम योग, दंड योग, घोष, सांघिक गीत हे कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. त्यानंतर शस्त्रपूजनही होईल. भारतीय आर्थिक सेवेतून निवृत्त झालेले सत्यप्रकाश राय हे प्रमुख अतिथी म्हणून या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.