नागपूर : विदर्भात कालपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे नागपुरातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.


रात्री पावसानं विश्रांती घेतली होती, तर सकाळी पावसाच्या हलक्या सरी येत आहेत.

नागपुरात नऊ तासात 265 मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेतील पावसाची आकडेवारी आहे. याआधी 1994 साली 304 मिमी पावसाची नोंद झाली होती.
विदर्भाला पावसाचा तडाखा, नागपुरात येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

दरम्यान, वीज कोसळून नागपूरच्या रामटेक भागात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मंगलदीप नगरमध्ये निलेश चावके नावाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती आहे.

मुसळधार पावसामुळे पावसाळी अधिवेशनाचा कालचा दिवस पाण्यात गेला. साचलेल्या पाण्यामुळे विधीमंडळ परिसराला तळ्याचं स्वरुप प्राप्त झालं. त्याचबरोबर विधानभवनातील बत्तीही काही काळ गुल होती. परिणामी विधीमंडळाचं कामकाज रद्द करण्यात आलं.