नागपूर : भाजप नेते मुन्ना यादव यांच्यावर दाखल असलेला हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नागपूर पोलिसांनी मागे घेतला आहे. पोलिसांनी या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. त्यामध्ये मुन्ना यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर लावलेल्या हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपांऐवजी सामान्य मारहाणीचं (कलम 326) लावण्यात आलं आहे.

नागपूर पोलिसांनी मुन्ना यादव प्रकरणी धक्कादायक यू टर्न घेतला आहे, ज्याने प्रत्येक जण हैराण आहे. पोलिसांनी या प्रकरणात प्रतिस्पर्धी काँग्रेस गटाचे नेते मंगल यादव यांच्या विरोधातले हत्येच्या प्रयत्नाचे आरोपही मागे घेतले असून त्यांच्यावर कलम 324 अन्वये किरकोळ मारहाणीचा आरोप ठेवला आहे.

काय आहे प्रकरण?

भाऊबीजेच्या दिवशी चुनाभट्टी परिसरात भाजप नेते मुन्ना यादव आणि काँग्रेस नेते मंगल यादव यांच्या गटात तुफान हाणामारी झाली. मुलांमध्ये फटाके फोडण्याच्या वादातून सुरु झालेलं हे प्रकरण नंतर एकमेकांवर जीवघेणे हल्ले करण्यापर्यंत गेलं. त्या दिवशी झालेल्या राड्यात दोन्ही गटातील जवळपास 15 जण जखमी झाले. धंतोली या स्थानिक पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी या प्रकरणाची वेळीच दखल घेत दोन्ही गटातील लोकांवर कलम 307 अन्वये हत्येच्या प्रयत्नाचा आणि दंगलीचा गुन्हा दाखल केला.

तेव्हापासूनच दोन्ही गटातील बहुतांशी जण फरार होते. दरम्यानच्या काळात घटनेचा तपास धंतोली पोलीस स्टेशनकडून काढून घेऊन तो क्राईम ब्रांचकडे सोपवला. घटनेच्या तब्बल साडे चार महिन्यांनंतर पोलिसांनी या प्रकरणात न्यायालयात आरोपपत्र दाखल करत आधीच्या आरोपांच्या तुलनेत अगदी मवाळ आरोप लावत राजकीय दबावापुढे शरणागती पत्करल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या काळात विरोधकांनी भाजप नेते मुन्ना यादववर हत्येच्या प्रयत्नासारखा गंभीर आरोप लागल्यानंतर थेट विधानसभेत तो प्रश्न उचलून धरला होता. तरीही पोलिसांनी मुन्ना यादव यांच्यावरील गंभीर स्वरुपाचा गुन्हा मागे घेत केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला.

मुन्ना यादव यांनी दरम्यानच्या काळात अनेक वेळा न्यायालयातून त्यांच्या विरोधातल्या 307 च्या आरोपाप्रकरणी जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात जामीन देण्यास नकार दिल्यामुळे आता पोलिसांनीच त्यांच्या आरोपपत्रात 307 म्हणजेच हत्येच्या प्रयत्नाचे आरोप मागे घेत 326 अन्वये सामान्य मारहाणीचे आरोप ठेवले आहेत. त्यामुळे भाजप नेते मुन्ना यादव यांच्या जामिनाचा मार्ग आता मोकळा झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान, मुन्ना यादव प्रकरणावरुन हिवाळी अधिवेशन तापलं होतं. सरकारला विरोधकांनी धारेवर धरलं. सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत योग्य त्या कारवाईचं आश्वासन दिलं. मात्र आता अचानक असं काय झालं, ज्यामुळे पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा मागे घेत किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

संबंधित बातम्या :

नागपूर पोलिसांना आरोपी मुन्ना यादव सापडेना!

नागपुरातील भाजप नेते मुन्ना यादव यांची CID चौकशी सुरु

स्वातंत्र्यदिनाच्या रॅलीत धिंगाणा, मुन्ना यादवांच्या मुलांवर गुन्हा