कोल्हापूर: पाणी बिल थकवल्यामुळे कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. जलसंपदा विभागानं ही कारवाई केली.


कोल्हापूर महापालिकेनं 21 कोटी 94 लाख रुपयांचा कर थकवला आहे. याप्रकरणी जलसंपदा विभागानं पालिकेला अनेकवेळा नोटीस बजावली. तरीही पालिकेनं थकीत रक्कम भरली नाही. त्यामुळे अखेर शिंगणापूर पाणी उपसा केंद्रावर जलसंपदा विभानानं कारवाई केली.

आता पाणी पुरवठा खंडीत झाल्यानं कोल्हापूरकरांना पाणीबाणीला सामोरं जावं लागू शकतं.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पंचगंगा नदीतून महापालिका नागरिकांसाठी पिण्याचे पाणी उपसा करते. या पाण्यासाठी जलसंपदा विभागातर्फे दरमहा महापालिकेला बिल पाठविण्यात येते. मात्र, महापालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाची थकबाकी मोठ्या प्रमाणात थकविली आहे. महापालिकेकडे 21 कोटी 94 लाख 54 हजार रुपयांची थकबाकी आहे.

डिसेंबर 2018 पर्यंत केवळ पाणीपट्टीची रक्कम 19 कोटी 22 लाख 55 हजार 130 रुपये आहे. तर जानेवारी 2018 या महिन्याची 26 लाख 71 हजार 339 रुपयांची थकबाकी आहे.

दंड, स्थानिक उपकर, विलंब शुल्क अशी एकूण 21 कोटी 94 लाख 54 हजार दोन रुपये थकबाकी आहे. या थकबाकीसंदर्भात जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंत्यांनी आयुक्तांची भेट घेऊन थकबाकी भरण्याची विनंती केली होती.

या बैठकीत काही रक्कम भरण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र, अद्यापही थकबाकी भरलेली नाही.

थकबाकीची रक्कम पाहता जलसंपदा विभागाने महापालिका प्रशासनास अंतिम नोटीस बजावली. थकबाकी भरण्यास 5 मार्च ही अंतिम तारीख देण्यात आली होती.

या नोटीसची प्रत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. सतेज पाटील, आ. राजेश क्षीरसागर, आ. अमल महाडिक यांच्यासह जिल्हाधिकार्‍यांनाही पाठविण्यात आली होती.

संबंधित बातम्या

22 कोटीची थकबाकी, कोल्हापूरचा पाणीपुरवठा रोखण्याची नोटीस