नागपूर: एखाद्या सिग्नलवर आपल्याला लहान मुलं भीक मागताना दिसली, तर दयाभाव दाखवून आपण त्या मुलांच्या हातावर पैसे टेकवतो. मात्र यापुढे रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांना भीक देताना सावधानता बाळगा.
कारण मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लहान मुलांना मारहाण करुन, त्यांना भीक मागायला लावणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी 3 महिलांना अटक करण्यात आली आहे, तर 4 पुरुष आरोपी फरार आहेत.
दुसरीकडे 8 लहानग्यांची सुटका केली असून त्यामध्ये 7 मुलींचा समावेश आहे. सुटका केलेल्या चिमुकल्यांनी सांगितलेलं वास्तव तर अत्यंत भीषण आहे.
"रोजचे 500 रुपये कमवले तरच जेवण, अन्यथा जबरदस्त मारहाण करण्यात येत असे", असं या मुलांनी सांगितलं.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
नागपुर पोलिसांच्या क्राईम ब्रांच आणि जिल्हा बाल संरक्षण समितीच्या संयुक्त पथकाने सीताबर्डी भागात कारवाई करत 8 मुलांना अशा टोळीच्या तावडीतून सोडविले आहे. ही टोळी कसे 3 ते 10 वयोगटातील एकेका मुलाला रोज 200 ते 500 रुपयांपर्यंत भीक मागायला मजबूर करायची हे सोडवणूक करण्यात आलेल्या चिमुकल्यांनी सांगितलं.
मूळात नागपुरात सीताबर्डी परिसरासह संत्रा मार्केट, कॉटन मार्केट, मोरभवन, पंचशील चौक, आरबीआय चौक अशा अनेक भागात लहान मुलांकडून भीक मागवून घेतली जात असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. तसेच यामागे एक मोठी टोळी कार्यरत असल्याचे पुरावे मिळाले होते.
त्यामुळे जिल्हा बाल संरक्षण समितीने या सर्व भागात सर्व्हे केले. त्यामध्ये या टोळ्या कशाप्रकारे काम करतात याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
3 ते 10 वर्ष वयोगटातील मुले आणि मुलींच्या माध्यमाने ही टोळी हा गोरखधंदा करते. आणि बालकाला भीक मागून किमान 200 ते 500 रुपये रोज कमावण्याचे टार्गेट दिले जाते. तेवढे पैसे भीक मागून आणले नाही तर त्या बालकाला त्या दिवशीचे जेवण दिले जात नाही असे वास्तव समोर आले. याशिवाय टोळीच्या पुरुष सदस्यांकडून मारही खावा लागतो.
सर्व्हेमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारावर बाल संरक्षण समितीने नागपूर पोलिसांकडे रीतसर तक्रार केली आणि संयुंक्त कारवाईमध्ये 8 लहान मुलांची या टोळीच्या तावडीतून सोडवणूक झाली.
पोलिसांनी या मुलांच्या अवतीभवतीतून 3 महिलांना अटक केली असून 4 पुरुष सहकारी फरार झाले आहेत. त्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
दरम्यान, ही सर्व लहान मुलं या टोळीकडे कशी आली, काही मुलं टोळीतील सदस्यांच्या नात्यातले आहेत का? या लहान मुलांचे खरे आई वडील कुठे आहेत? याचा शोध ही पोलिसांनी सुरु केला आहे.
सोडवणूक करण्यात आलेल्या सर्व लहान मुलांची रवानगी अनाथाश्रमात करण्यात आली आहे.
जिल्हा बाल संरक्षण समिती आणि नागपूर पोलिसांच्या कारवाईमुळे 8 सुदैवी बालकांची सोडवणूक झाली असली तरी नागपूर, पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरात प्रत्येक सिग्नलवर अशी अनेक दुर्दैवी मुले भीक मागताना दिसतात. त्यामुळे दक्ष समाज म्हणून आपण सर्वांनी सावध राहून ही मुले खरोखर त्यांच्या आई वडिलांसोबत आहेत की एखादी टोळी त्यांचा वापर करून लाखो रुपये कमवत आहेत, आणि लहान मुलांवर अत्याचार करत आहेत एवढी सावधगिरी आपण बाळगली पाहिजे.