लोणावळा: लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडाला आज 1 महिना पूर्ण झाला आहे. मात्र, अद्यापही पोलिसांचे हात रिकामेच आहेत. 3 एप्रिलला सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुंबरे या विद्यार्थ्यांचे मृतदेह भुशी धरणाच्या डोंगरात आढळले होते.


विशेष म्हणजे दोघांचेही हात बांधलेल्या अवस्थेत आढळल्यानं या घटनेचं गूढ आणखी वाढलं आहे. सिंहगड कॉलेजात सार्थक मेकॅनिकल इंजिनीअरिंग तर श्रुती कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. हत्येचा अद्याप उलगडा न लागल्यानं सार्थकच्या नातलगांनी पोलिसांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सार्थक अहमदनगच्या राहुरीचा तर श्रुती पुण्यातील ओतूरची आहे.

'जर गुन्हेगारांना तात्काळ अटक केली नाही तर मी पोलीस स्टेशनसमोरच आत्मदहन करेन.' असा इशारा सार्थक वाघचौरेच्या आईनं पोलिसांना दिला. आज लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सार्थकच्या नातेवाईकांनी निवेदन देत मारेकऱ्यांना तातडीनं पकडण्याची मागणी केली.

काय आहे प्रकरण?

लोणावळ्यात महाविद्यालयीन तरुण सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुंबरे या तरुणीचा मृतदेह हात बांधलेल्य अवस्थते आढळून आले होते. मृत तरुण आणि तरुणी लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे विद्यार्थी होते. तरुण अहमदनगरच्या राहुरीचा, तर तरुणी मूळची पुण्याच्या ओतूरची होती.

हे दोघेही रविवारी संध्याकाळपासून गायब होते. मात्र सोमवारी संध्याकाळी लोणावळ्यातल्या आयएनएस शिवाजी समोर आणि भुशी धरणाच्या टेकडीवर या दोघांचे थेट मृतदेहच सापडले.

हात बांधून तीक्ष्ण वस्तूवर डोकं आपटल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. तसंच दोघांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणाही आढळल्या आहेत.

दोन्ही मृतदेहांचे हात-पाय बांधण्यात आले होते. तर अंगावर आणि डोक्यावर जबर जखमा आढळल्या आहेत. दरम्यान, हे दोघं तिथे कसे पोहचले. त्यांच्यासोबत नेमकं काय झालं?. याचा तपास लावण्याचं आव्हान पोलिसांपुढे निर्माण झालं आहे.

याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. लोणावळा पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या:

'लोणावळा हत्याकांडाची कसून चौकशी करा'