नागपूर : नागपूरच्या ताजाबादमधली पालिकेची शाळा... मधली सुट्टी झाली की विद्यार्थिनींना लघुशंकेला जायचं असतं. पण स्वच्छतागृहाऐवजी त्यांची पावलं शेजारच्या घरांकडे वळतात. कारण...
खुशबुनिसा आणि तिची मैत्रिण एका घरात गेल्या... खाला को बुलाईये... असं सांगितल्यावर एक मुलगी दारात येते. दोघी तिच्याशी बोलतात आणि घरात जातात. ही अवस्था विषण्ण करणारी आहे. कारण 100 हून अधिक मुली असणाऱ्या शाळेत विद्यार्थिनींना हक्काचं शौचालयच नाही.
शाळेत असलेल्या एकमेव शौचालयाची अवस्था भीषण आहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी एकच शौचालय. शौचालय कसलं... कोंडवाडाच! पाळीच्या दिवसात या विद्यार्थिनींचं काय होत असेल, याची कल्पनाच करायला नको.
पालिकेला खेटे मारले, पत्रव्यवहार केला. पण पालिकेनं जणू झोपेचं सोंग घेतलं आहे. त्यामुळे या विद्यार्थिनींना आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आणखी किती काळ थांबावं लागणार, हे सांगता येत नाही.