Nagpur News : आधी लॉ (LAW) ची तयारी करताना दोन वर्षे वाया गेल्यामुळे हिंगणा मार्गावरील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये (GH Raisoni Institute of Engineering and Technology) सध्या पॉलिटेक्निक करणाऱ्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या बिल्डिंगवरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री 11.02 वाजताच्या सुमारास घडली आहे.

योगेश विजयकुमार चौधरी (20, श्रीरामनगर, भुसावळ, जि. जळगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो हिंगणा मार्गावरील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये पॉलिटेक्निक सीओ शाखेत प्रथम वर्गात शिक्षण घेत होता. योगेशने 11 वी व 12 वी कॉमर्स केल्यानंतर लॉच्या अॅडमिशनसाठी तयारी केली. यात त्याचे दोन वर्षे गेल्यानंतरही त्याला यश मिळाले नाही. त्याच्या सोबतचे दहावीतील सगळे मित्र लॉ आणि इंजिनिअरिंगला गेले. या सगळ्या घडामोडीत 4 वर्षे गेल्यानंतर योगेशने पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला. तेथे त्याच्यासोबत शिकणारे सर्वजण 16 वर्षांचे आणि योगेश 20 वर्षांचा होता. आपले चार वर्षे वाया गेल्यामुळे त्याला सतत वाईट वाटायचे.

मित्रांसोबत व्यक्त केली होती खदखद

चार दिवसांपूर्वी योगेशने आपला रुम पार्टनर सार्थकजवळ आत्महत्येचा विचार बोलून दाखविला होता. आपले चार वर्षे वाया गेल्यामुळे मला कॉलेजच्या बिल्डिंगवरून उडी (Student Jump from Building) घेऊन आत्महत्या करावी वाटते, असे त्याने बोलून दाखविले होते. परंतु त्याचे बोलणे सहज वाटल्यामुळे रूम पार्टनरने ते फारसे गंभीरपणे घेतले नाही. योगेशच्या कुटुंबात आई-वडील आणि एक बहीण आहे. बहिणीचे लग्न झाले आहे. योगेशच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

जेसीबीला दुचाकी धडकल्याने युवकाचा मृत्यू

दुसऱ्या एका घटनेत रस्त्याच्या बाजूला निष्काळजीपणे जेसीबी उभा केल्यामुळे दुचाकी जेसीबीवर आदळून गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री 1:45 वाजण्याच्या सुमारास घडली. सौरभ अरविंद चर्लेवार (27, सहकारनगर (नंदनवन) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री 1:45 वाजण्याच्या सुमारास सौरभ हे दुचाकी क्रमांक (एमएच 49 बीएस 3801) ने जात होते. नंदनवन झोपडपट्टी गल्ली नं. 12, मयूर टेलर समोर रोडच्या बाजूला आरोपी जेसीबी चालकाने जेसीबी क्रमांक (एमएच 49 बीबी 5166) निष्काळजीपणे उभा करून ठेवला होता. सौरभची दुचाकी जेसीबीवर धडकली. यात सौरभ गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.