Nagpur News : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापले. सर्व राजकीय पक्षांकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत असल्याने नागपूर कॉंग्रेसच्यावतीनेही सेमिनरी हिल्स परिसरातील राजभवन येथे आंदोलनाची हाक देण्यात आली. विदर्भात नुकतीच 'भारत जोडे यात्रा' झाली असल्याने भव्य आंदोलन होणार असल्याचा अंदाज लावून नागपूर पोलिसांचे 50 पेक्षा जास्त कर्मचारी आणि 10 अधिकाऱ्यांचा फौजफाटा राजभवन परिसरात तैनात करण्यात आला. मात्र दिलेल्या वेळेपेक्षा तब्बल एक तासानंतर फक्त आठच आंदोलक आंदोलनस्थळी पोहोचले. त्यानंतरही फक्त एका मिनिटाच्या आतमध्ये पोलिसांनी सर्व आठ आंदोलकांना ताब्यात घेतले.


एकीकडे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी आणि नागरिकांना आपल्यासोबत घेण्यासाठी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे 'भारत जोडो यात्रेच्या' माध्यमातून देश पिंजून काढत आहेत. मात्र दुसरीकडे नियोजनाअभावी कॉंग्रेसचे आंदोलनही उपराजधानीत थट्टेचा विषय ठरत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संघाचा मुख्यालय असलेल्या नागपुरात आज काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं. नागपूरातील सदर परिसरात राज्यपालांचा शासकीय निवास असलेल्या राजभवनच्या समोर आंदोलन करण्याची हाक युवक काँग्रेसच्यावतीने देण्यात आली होती. थेट राजभवन समोर युवक काँग्रेस कडून आंदोलन केलं जाईल आणि तो आंदोलन खूप मोठा होईल असा पोलिसांचा अंदाज होता. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौज फाटा राजभवन समोर तैनात करण्यात आला होता.


तासभर वाट अन् आंदोलक पोहोचले फक्त आठ


नागपूर कॉंग्रेसच्यावतीने आंदोलनासाठी दुपारची वेळ दिली होती. मात्र एक तासानंतरही वाजेपर्यंतही एकही आंदोलक नियोजितस्थळी पोहोचला नाही. याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. तर माध्यमकर्मींचीही मोठी गर्दी होती. काही वेळानंतर फक्त आठ आंदोलक आंदोलनस्थळी पोहोचले. कार्यकर्त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांच्या हातात कोशियारीचा निषेध करणारा बॅनरही होते. त्या बॅनर वरील भगतसिंग कोशियारी यांच्या फोटोला काळा फासण्याचा प्रयत्न युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आणि पोलिसांनी बॅनर सह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. अवघ्या एका मिनिटात हा आंदोलन संपुष्टात आला.


आंदोलनाकडे युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची पाठ!


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद कुणाल राऊत नागपुरात होते. मात्र शहरातच युवक कॉंग्रेसने पुकारलेल्या आंदोलनाला त्यांनी हजेरी लावली नाही. त्यांच्या या कृतीबद्दल कार्यकर्त्यांनी खासगीत नाराजी बोलून दाखविली. तसेच त्यांनी पुकारलेल्या आंदोलनातच ते सक्रिय असतात. मात्र सामान्य कार्यकर्त्यांनी आंदोलने केल्यात त्यांच्याकडून प्रतिसाद देण्यात येत नसल्याचेही नाव न छापण्याच्या अटीवर जुन्या युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्याने सांगितले.


ही बातमी देखील वाचा


आज जेल, कल बेल और फिर वही पुराना खेल... ; पोलिसांच्या व्हॅनमधूनच कुख्यात गुन्हेगाराची हवाबाजी