Nagpur News : नव्या वर्षात समृध्दी महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा होणार आहे. यामुळे नागपूर-औरंगाबाद-शिर्डी मार्गे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची सोय होणार आहे. मात्र नागपूर ते औरंगाबाद नियमितपणे प्रवास करत असलेल्या चार हजार प्रवाशांसाठी समृद्धीचा प्रवास महागडा असल्याने रेल्वेची कनेक्टिव्हिटी देण्याची मागणी दक्षिण मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या वतीने केली जात आहे. 


दुप्पट प्रवासी वाढले 


मुख्यत: नागपूर ते जालना-औरंगाबाद (Aurangabad) प्रवास करणारे प्रवासी मागील काही वर्षात दुप्पट संख्येने वाढले आहेत. सध्याच्या घडीला नागपुरातून जवळपास 70 बसेस औरंगाबाद मार्गे धावत आहेत. यात एसटी महामंडळाच्या 10 बसेस, खाजगी ट्रॅव्हल्सच्या 60 बसेसचा समावेश आहे. दरम्यानचे प्रवास भाडे 700 ते 1100 रुपये असल्याने प्रवाशांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. 


नंदीग्राम नागपुरातून सुरु करा 


नागपूर ते औरंगाबाद दरम्यान नंदीग्राम एक्सप्रेस (NANDIGRAM EXP) नियमितपणे सुरु केल्यास प्रवाशांची उत्तम सोय होणार आहे. यापूर्वी अमरावती ते औरंगाबाद, अकोला ते औरंगाबाद धावणारी नंदीग्राम एक्सप्रेस नागपुरातून सुरु केल्यास हजारो प्रवाशांची दमछाक वाचणार आहे. नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) सुरु होत असताना नागपूर ते औरंगाबाद रेल्वेची कनेक्टिव्हीटी जोडण्याची गरज आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मोठया संख्येने नागरिक नागपूर ते औरंगाबाद प्रवास करत असतात. यामार्गावर सोयीस्कर रेल्वेची व्यवस्था झाल्यास अनेकांना आरामशीर प्रवास करता येणार आहे. 


बहुतांश बसेस हाऊसफुल


विशेषत: नागपूर ते औरंगाबाद प्रवास करणारे सर्वाधिक नागरिक हे उद्योग, व्यवसाय, व्यापार, शैक्षणिक क्षेत्रातील असून या प्रवाशांना एसटी बसेस, खाजगी ट्रॅव्हल्सशिवाय (Private Travels) अन्य पर्याय नसल्याने या मार्गावर धावणाऱ्या बहुतांश बसेस हाऊसफुल धावत असतात. 


रेल्वे मंडळाला निवेदन


दक्षिण मध्य रेल्वेने या मार्गावर रेल्वे सुरु केल्यास हजारो प्रवाशांची सोय होणार आहे. कोरोनाच्या संक्रमणापूर्वी या मार्गावर नंदीग्राम एक्स्प्रेस धावत होती. खाजगी ट्रॅव्हल्स बसद्वारे प्रवास करताना अधिक पैसे मोजावे लागते. ही बाब लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या वतीने एक निवेदन रेल्वे मंडळाला देण्यात आले आहे. प्रवाशांची गरज लक्षात घेवून नागपूर ते औरंगाबाद रेल्वेची सुविधा सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 


ही बातमी देखील वाचा


श्रद्धाला 2 वर्षांपूर्वीच लागलेली मृत्यूची कुणकुण? नोव्हेंबर 2020 मध्येच केलेली आफताबविरोधात तक्रार