Nagpur News नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आभा पांडे (Abha Pandey) यांनी भाजप नेत्यांबद्दल अवमान कारक वक्तव्य करू नये आणि त्यांनी आपला प्रभाग सोडून भाजप आमदार कृष्णा खोपडे (Krishna Khopde) यांच्या पूर्व नागपूर (Nagpur) मतदारसंघात ढवळाढवळ ही करू नये, असा थेट इशारा भाजपचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी दिला आहे.


अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी पूर्व नागपूरचे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्यावर लावलेले सर्व आरोप निराधार असून हा केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार असल्याचे मतही भाजपचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता अतिक्रमण विरोधी कारवाईच्या मुद्द्यावरून नागपुरात महायुतीच्या (Mahayuti) दोन नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे चित्र असून यात भाजपकडून देखील आता जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 


अतिक्रमण विरोधी कारवाईचा वाद शिगेला 


राज्यात लोकसभेच्या निवडणुका अद्याप संपलेल्या नाहीत. मात्र त्यापूर्वीच उपराजधानी नागपुरात महायुतीच्या (Mahayuti) दोन पक्षांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आमदार कृष्णा खोपडे (Krishna Khopde) यांच्या विरोधात त्याच मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेविका आभा पांडे (Abha Pandey) यांनी जोरदार मोर्चा उघडला होता. दोघांमधील वादाला कारण ठरले आहे ते रस्त्यांच्या मधोमध असलेल्या एक अतिक्रमणाविरोधात झालेली कारवाईचे आणि त्यानंतर जवळच्या एका हनुमान मंदिर आणि बौद्ध विहाराला अतिक्रमणासंदर्भातच मिळालेली नोटीसचे.


या वादात आता दोन्ही बड्या नेत्यांकडून अनेक आरोप-प्रत्यारोप आणि टीकेचा फैरी झाडल्या जात आहे. त्यामुळे निकालापूर्वीच नागपुरात महायुतीत दोन नेत्यांमधील हा वाद राजकीय वातावरणात चर्चेचा विषय ठरला आहे. अशातच आता नगरसेविका आभा पांडे यांना भाजपकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे


महायुतीच्या दोन नेत्यांमध्ये जुंपली   


आभा पांडे यांनी कालच वाठोडा परिसरातील हनुमान मंदिर आणि बौद्ध विहाराला मिळालेल्या अतिक्रमणाच्या नोटीसीच्या मुद्द्यावरून कृष्णा खोपडे यांच्यावर गंभीर आरोप करत आंदोलन सुरू केले होते. आमदार कृष्णा खोपडे त्यांच्या कार्यकर्त्याच्या रस्त्यावरील अतिक्रमणाच्या विरोधात झालेल्या कारवाईचा राग परिसरातील हनुमान मंदिर आणि बौद्ध विहारावर काढत असल्याचा पांडे यांचा आरोप होता. नागपूर सुधार प्रन्यासने काही दिवसांपूर्वी वाठोडा परिसरात रस्त्यावर असलेलं एक अतिक्रमण काढलं होतं.


त्याचाच राग धरून कृष्णा खोपडे यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणून परिसरातील हनुमान मंदिर आणि बौद्ध विहाराला अतिक्रमणाची नोटीस पाठवल्याचा पांडे यांचा आरोप होता. काल आभा पांडे यांनी परिसरातील काही नागरिकांच्या मदतीने नोटीस मिळालेल्या हनुमान मंदिर आणि बौद्धविहारसमोर ठिय्या आंदोलनही केले होते.


आमच्या नेत्यांबद्दल अवमानकारक बोलू नये- बंटी कुकडे


महायुतीतील मित्रपक्षाच्या महिला नेत्याने भाजप आमदारावर गंभीर आरोप केल्यानंतर आता भाजपनेही पलटवार केला आहे. आमच्या नेत्यांबद्दल अवमानकारक बोलू नये आणि आपल्या प्रभागाचे काम सोडून कृष्णा खोपडे यांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नये असा इशाराच भाजपने दिलाय. त्यामुळे महायुतीतील दोन मित्रपक्षाच्या नेत्यांमध्ये सुरू झालेला कलगीतुरा भविष्यात नागपुरात महायुतीतील नेत्यांची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे.


इतर महत्वाच्या बातम्या