नागपूर: तीक्ष्ण हत्याराने कमलाकर पवनकर यांच्या कुटुंबातील पाच जणांची हत्या करणारा आरोपी सापडला आहे. कमलाकर पवनकर यांचा बेपत्ता असलेला मेहुणा विवेक पालटकरला नागपूर पोलिसांनी पंजाबमध्ये बेड्या ठोकल्या.


विवेकला पंजाबमधील लुधियाना येथून अटक करण्यात आली असून, पोलिसांचं पथक विवेकला घेऊन नागपूरकडे येत आहेत.

11 जूनला नागपूरमध्ये विवेक पालटकरने स्वत:च्या मुलासह बहीण, मेहुणा, सासू, भाची अशा पाच जणांची निर्घृण हत्या केली होती. कमलाकर पवनकर हे भाजपाचे कार्यकर्ते होते. हत्येनंतर आरोपी विवेक पालटकर पसार झाला होता.

कमलाकर पवनकर यांच्या घरी 10 जूनच्या मध्यरात्री हत्याकांडाचा थरार झाला होता. यात कमलाकर (45 वर्ष) यांच्यासह अर्चना पवनकर (पत्नी, वय 40 वर्ष), मीराबाई पवनकर (आई, वय 70 वर्ष), वेदांती पवनकर (मुलगी, वय 12 वर्ष, ), कृष्णा उर्फ गणेश पालटकर ( भाचा, वय 4 वर्ष) यांचा मृत्यू झाला.

मध्यरात्रीनंतर 1 ते 3 च्या दरम्यान पवनकर कुटुंबातील 5 सदस्यांची एकानंतर एक हत्या करण्यात आली. घरातल्या मुख्य बेडरुममध्ये एकाच डबलबेडवर कमलाकर पवनकर, त्यांची पत्नी अर्चना पवनकर, मुलगी वेदांती पवनकर आणि कमलाकरच्या मेहुण्याचा मुलगा कृष्णा पालटकर या चौघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर वृद्धा मीराबाई पवनकर यांचा मृतदेह किचनमध्ये जमिनीवर होता.

कमलाकर पवनकर हे भाजपचे पदाधिकारी होते. त्यामुळे यामागे राजकीय वैमनस्य असल्याची चर्चा होती. कमलाकर हे प्रॉपर्टी डीलरही होते, त्यामुळे आर्थिक वादातून झाल्याचीही शक्यता वर्तवली गेली. पण पोलिसांना संशय मात्र वेगळाच होता.

10 जूनच्या रात्री पवनकर यांच्या घरी पाच मृत, दोन बचावलेल्या सात जणांव्यतिरिक्त आणखी एक माणूस होता. कमलाकर यांचा मेहुणा विवेक पालटकर. त्याची गाडी घराबाहेर होती. पण विवेक बेपत्ता होता.

ना झटापटीचे निशाण, ना लुटीचा प्रयत्न. त्यामुळे हे कृत्य घरातल्याच माणसाने केलं असण्याची शक्यता दाट होती.

आपल्याच पत्नीची हत्या करुन जेलमध्ये गेलेल्या विवेक पालटकरच्या दोन्ही मुलांची जबाबदारी कमलाकर यांनी घेतली होती. पण आज त्याच कमलाकर यांचं स्वतःच्या जीवासह अख्खं कुटुंब संपलं. मागे उरले... दोन कोवळे जीव.

संबंधित बातम्या

ना झटापट, ना लुटीचे निशाण, पवनकर कुटुंबाच्या हत्येचं गूढ  

नागपुरात अख्ख्या कुटुंबाची हत्या, तीक्ष्ण हत्याराने पाच जणांचा खून