Nagpur News Update : येत्या 22 मार्चपासून नागपूरमध्ये ‘जी-20’ च्या उपसमितीची बैठक होणार आहे. यासाठी शहरात जय्यत तयारी सुरू आहे. विदेशी पाहूण्यांसमोर शहराचे वास्तव समोर येऊ नये म्हणून शहर सजवण्याचा घाट घातला जात आहे. मात्र, हे करताना महापालिकेकडून शहरातील झाडांवर तब्बल चार लाख खिळे ठोकल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या या कृत्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करण्यासोबतच वृक्ष संवर्धन अधिनियमांचे उल्लंघन पालिकेकडून केले जात आहे. याच कायदा आणि नियमाच्या उल्लंघनावरुन महापालिकेने शहरातील नागरिकांना दंड ठोठावला आहे. परंतु, आता हे खिळे ठोकणाऱ्या महापालिकेकडून हा दंड कोण वसूल करणार? शहरातील झाडांचे झालेले नुकसान कोण भरुन काढणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
जी-20 च्या उपसमितीची नागपुरात 21 आणि 22 मार्च रोजी बैठक होत आहे. त्यासाठी नागपुरात प्रशासनाने स्वच्छता आणि सौंदर्यकरणाची जय्यत तयारी केली आहे. शिवाय शहरात रात्रीच्या वेळेलाही वेगवेगळ्या रंगाच्या आकर्षक लाइट्सचा झगमगाट राहावं यासाठी नागपुरातील हजारो झाडांवर लाखो खिळे ठोकून विजेच्या रंगीत माळा, मोठ्या लाइट्स, हॅलोजन, पार लाइट्स लावण्यात आल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक झाडावर 35 ते 45 मोठे खिळे, म्हणजेच पूर्ण नागपुरात चार लाखांपेक्षा पेक्षा जास्त खिळे झाडांवर ठोकले आहेत.
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष जतन अधिनियम अन्वये झाडांवर खिळे ठोकण्यासह कुठलीही लोखंडी वस्तू ठोकण्यावर बंदी आहे. असे असताना अवघ्या दोन दिवसांच्या परदेशी पाहुण्यांच्या आगमनाच्या निमित्ताने प्रशासनाकडून हजारो वृक्षांवर लाईट लावण्याच्या नावाखाली लाखो खिळे ठोकण्यात आले आहेत. इतरवेळी नागरिकांनी किंवा जाहिरातीच्या अनुषंगाने कुठल्या ही व्यापाऱ्याने वृक्षांच्या बुंध्यावर खिळे ठोकले तर महापालिकेकडून कारवाई केली जाते, दंड आकारला जातो. त्यामुळे आता जी ट्वेंटी च्या बैठकीच्या आयोजनाच्या नावाखाली महापालिका स्वतः नियमांचा उल्लंघन का करत आहे? आणि पर्यावरणाची अशी हानी का करत आहे? असा प्रश्न पर्यावरणप्रेमींनी विचारला आहे.
नागपूरच्या सिविल लाईन्स परिसर आणि इतर अनेक भागात अशाच पद्धतीने झाडांना खेळ ठोकून जखमी करण्यात आले आहे. अगदी मुख्यमंत्री सचिवालयाच्या समोरही प्रशासनाने अशीच कृती केली आहे. आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना कृत्रिम रोषणाईचा असा झगमगाट दाखवण्यासाठी वर्षभर नागपूरला ऑक्सिजन देणाऱ्या झाडांना जखमी करण्याचा शहाणपण महापालिकेने का केला असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. एबीपी माझाने या संदर्भात नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान आणि वीज विभागाशी संपर्क साधला. मात्र कोणताही अधिकारी कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाही.